रत्नागिरी – आंदोलन स्थगित पण पोलीस फौजफाटा तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलन शु्क्रवारी चिघळले होते. त्यानंतर, तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आंदोलकांच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केला. त्यामुळे सर्व्हेक्षण स्थळाकडे आज आंदोलक फिरकलेले नसल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून आंदोलकांच्या उपस्थितीने गजबलेला बारसू परिसरातील सडा आज काहीसा शांत दिसत होता. मात्र, पोलीस फौजफाटा ठिकठिकाणी तैनात केलेला होता.अटक झालेल्या 80 महिलांना रात्री सोडण्यात आले तर 35 पुरूष ग्रामस्थाना आज न्यायालयात हजर करून जामीनावर मुक्तता करण्यात आली.

तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरीसाठी माती परिक्षणाचे सर्व्हेक्षण केले जात आहे. त्याला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून या परिसरातील ग्रामस्थ माती परिक्षणाचे काम होत असलेल्या परिसरामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते. माती परिक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या कामाला लोकांकडून विरोध होण्याचे लक्षात घेवून पोलिस प्रशासनही कमालीचे सतर्क झालेले होते. ठिकठिकाणी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.

माती परिक्षणाच्या सर्व्हेक्षणाच्या सुरूवातीला काही आंदोलकांनी पोलीसांच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न कला होता. त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलक महिलांना अटकही केली होती. त्यानंतर, माती परिक्षणाचे आणि ग्रामस्थांचे आंदोलनही शांततेमध्ये सुरू होते. जिल्हा प्रशासनाने रिफायनरीच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी विशेष बैठक घेवून संवादही साधला होता. दरम्यान, काल आंदोलक मोठ्यासंख्येने सड्यावर जमा झाले होते. यावेळी आंदोलकांनी दुपारच्यावेळी सर्व्हेक्षणस्थळी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पोलिसांनीही अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी झटापट होवून आंदोलन चिघळले होते. त्याच्यातून शुक्रवारी दिवसभर या परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, काल सायंकाळी रिफायनरी विरोधी ग्रामस्थांच्या स्थानिक नेत्यांनी तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज सर्व्हेक्षणस्थळी आंदोलक फिरकलेले नसल्याने गेल्या पाच दिवसांपासून आंदोलकांच्या गजबजलेला सर्व्हेक्षणस्थळाच्या येथील सडा परीसर काहीसा शांत झालेला दिसत होता. दिवसभर फारसे तणावाचे वातावरण नसले तरी मात्र, या परिसरामध्ये पोलीस फौजफाटा ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला होता.

बारसू परिसरातील सड्यावर काल चिघळलेल्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सुमारे 75 ते 80 महिला आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस देवून तात्काळ मुक्त करण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सुमारे 36 आंदोलकांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना वैयक्तीक जामानीवर सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.