रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्रातील डीन, प्रिन्सीपल यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी भलतेच कौशल्य दाखवले आहे. बनावट आधारकार्ड तयार करुन परीक्षेला चक्क बोगस परिक्षार्थी बसवण्याचा प्रकार करण्यात आला. कौशल्य विकासचा नक्की विकास काय? सरकारचे कौशल्य विकास धाब्यावर बसवत या मंडळींनी आपले कौशल्य दाखवले आहे. मिंधेसरकारच्या राजवटीत बोगस प्रकाराचे प्रमाण वाढत असून रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्रातील नवीन घोटाळा पुढे आला आहे.
कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगसगिरीचे कौशल्य दिसून आले आहे. कौशल्य विकास केंद्रामध्ये बोगस परिक्षार्थीना बसवण्यात आले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डीन, प्रिन्सीपल सह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. डीन अमोल गोठकडे, प्रिन्सीपल रचना व्यास, श्रीनिवास माने, श्वेता खानविलकर, फईम शेळके, नेहा कांबळे, प्रियांका चव्हाण आणि एक अज्ञात इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
आधारकार्डवरील फोटो बदलले
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश तोरसकर यांनी सांगितले की, कौशल्य विकास केंद्रात परीक्षार्थीकडून आधीच आधारकार्ड घेऊन ठेवण्यात आली होती. त्या आधारकार्डवरती डमी परीक्षार्थीचा फोटो लावून बोगस आधारकार्ड बनवण्यात आली. ज्या विद्यार्थ्याच्या नावावर बोगस आधारकार्ड बनवण्यात आली त्या सर्वांना चौकशीसाठी बोलावणार आहे. तसेच आधारकार्ड आधीपासूनच का तयार करण्यात आले होते, याचीही चौकशी आम्ही करणार आहोत. तसेच परीक्षार्थीकडून बोगस डमी परीक्षार्थी बसवण्यासाठी काही पैसे घेतले होते का याचाही तपास केला जाणार आहे.