कैदी की घरगडी? कारागृहातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांना बनवले हमाल

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी विशेष कारागृहातून कैदी पळाल्याची घटना ताजी असताना बुधवारी दुपारी चक्क कारागृह कर्मचारी वसाहतीत एका कर्मचाऱ्याचे घरातील सामान ट्रक मध्ये भरण्याचे काम कैदी करत होते. कारागृहातील कैद्यांना चक्क घरकामाला जुंपल्याचेच हे चित्र दिसले. एकीकडे कारागृह नव्हे सुधारगृह असा टेंभा मिरवत सामाजिक कार्य करतो असे दाखवायचे आणि दुसरीकडे खरे पराक्रम आता उघडकीस येत आहे. हिच का खुले कारागृहाची संकल्पना? ही कोणती शिक्षा? हे कैदी की घरगडी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

एक आठवड्यापूर्वीच जन्मठेपची शिक्षा भोगणारा रूपेश कुंभार हा विशेष कारागृहातील अधिकाऱ्याच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अहोरात्र मेहनत घेऊन त्याला पुन्हा पकडले. ही घटना ताजी असताना बुधवारी दुपारी खळबळ उडविणारे दृश्य रत्नागिरीकरांनी पाहिले. विशेष कारागृह कर्मचारी वसाहतीत एका कर्मचाऱ्याचे सामान ट्रकमध्ये भरण्याचे काम कैदी करत होते. त्याचा व्हिडीओही सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे संतापाची लाट उमटली.

आपली प्रतिक्रिया द्या