सुशोभिकरणातून रत्नागिरी शहराला पर्यटनाचा साज – उदय सामंत

रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप पासून मांडवी पर्यंतची महत्वाची ठिकाणे सुशोभित करण्यात येणार आहेत. आज जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या पथकाने यासर्व ठिकाणांची पहाणी केली. या सुशोभीकरणातून रत्नागिरी शहराला पर्यटनाचा एक साज चढेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे पथक शहरातील साळवी स्टॉप येथील कमान,मारूती मंदिर येथील सर्कल, माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे यांचा पुतळा,जिल्हा रूग्णालया समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सावरकर चौक, मांडवी ही महत्वाची ठिकाणे सुशोभित करणार आहे.मारूती मंदिर येथील सुशोभिकरणासाठी 1 कोटी रूपये मंज़ूर झाले आहे.साळवी स्टॉप येथील कमानीसाठी 30 ते 35 लाख रूपयांची गरज असून तो निधी रत्नागिरी नगर परिषद देणार आहे. ही सर्व कामे पुढील दीड महिन्यात सुरू होतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

जे.जे.स्कूल आर्टचे जसे मुंबईत संग्रहालय आहे तसेच संग्रहालय थिबा राजवाड्यात उभारणार आहोत. रत्नागिरीकरांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांना जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांची कला पहाता येईल असे सामंत यांनी सांगितले. मांडवी किनारा ते भाट्ये किनारा पर्यंत आगळ्या वेगळ्या पध्दतीने सुशोभिकरण करण्यात येत असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते.

चौकट -त्या दोन कुलगुरूंचे राजीनामे व्यक्तीगत कारणाने

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेच्या कुलगुरूनी राजीनामे दिले त्यावरून काही जणांनी गैरसमज पसरवले होते. आज मी त्यांच्या राजीनाम्याविषयी माहिती घेतली. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेचे कुलगुरू व्ही.आर.शास्त्री यांनी प्रकृती आणि व्यक्तीगत कारणामुळेच राजीनामा दिला आहे. त्यांची माझ्याबद्दल कोणताही रोष किंवा तक्रार नाही मात्र काही लोकांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत गैरसमज पसरवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या