रत्नागिरी जिल्हापरिषद देणार स्व:उत्पन्न वाढीवर भर!

रत्नागिरी जिल्हापरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाशेजारील जिल्हापरिषदेच्या मालकीच्या जागांवर होर्डिंग्ज उभारण्यात येणार. तसेच जिल्हापरिषदेच्या मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्यात येणार असल्याचे जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.

जिल्हापरिषद अध्यक्षांच्या दालनात आज उत्पन्नवाढी संदर्भात बैठक झाली. या बैठकीला जि.प.अध्यक्ष रोहन बने, बांधकाम सभापती महेश म्हाप,शिक्षण सभापती सुनील मोरे, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हापरिषदेच्या उत्पन्नवाढीवर चर्चा झाली. जिल्हापरिषदेच्या मालकीच्या जागा शोधून त्या जागेतील आंबा, काजूची कलमे करारावर देण्यात येणार आहेत. कृषी गोदामे, जिल्हापरिषदेच्या जागेतील गाळे तसेच पाण्याचे टँकर भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे गाळे तसेच अन्य जागेतील गाळे, अॅक्टिव्हीटी सेंटर पुनर्जिवित करणार आहोत. पुढील महिन्यात जिल्हापरिषदेच्या आवारात ॲक्सिस बँकेत एटीएम सुरू करणार आहोत असे अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.

25 ठिकाणी होर्डिंग्ज उभारणार

मुंबई-गोवा महामार्गाशेजारी जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. अशा 25 ठिकाणी आम्ही होर्डिंग्ज उभारणार आहोत. त्यावर जाहिरातीच्या माध्यमातून जिल्हापरिषदेच्या उत्पन्नात भर पडेल असे रोहन बने यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या