
मोस्ट वॉण्टेड गुंड रवी पुजारीला हिंदुस्थानात आणले गेले असून सोमवारी त्याला बंगलोर येथील कोर्टात हजर केले जाणार आहे. बंगलोर पोलीस त्याची कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहेत.
पुजारी विरोधात कर्नाटकात 39, मंगळुरु येथे 36, उडिपी 11, मुंबई 50 आणि गुजरात येथे 75 असे मिळून 200 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पुजारीला पश्चिम आफ्रिकेच्या सेनगेल येथे अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यावर पुजारीने पलायन केले होते. अखेर त्याला रॉच्या मदतीने बंगलोर पोलिसांनी अटक केली. त्याला एअर फ्रान्सच्या विमानाने दिल्लीत आणले गेले. तेथून त्याला बंगलोर येथे नेले जाणार आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे आणि बंगलोरचे सहआयुक्त (गुन्हे) संदीप पाटील हे अधिकारी सोमवारी रवी पुजारीला कोर्टात हजर करणार आहेत. त्याच्या अटकेने पुजारी टोळीला मोठा हादरा बसला आहे. रवी पुजारी हा पूर्वी अंधेरीत राहत होता. सुरुवातीला तो छोटा राजन टोळीसाठी काम करत होता. मात्र 2006 ला रोहित वर्माच्या हत्येनंतर तो वेगळा झाला. त्याची एनआयए, सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे.
खोटय़ा नावाने पासपोर्ट
रवी पुजारी हा परदेशात अंथोनी फर्नांडिस या नावाने वावरायचा. त्याच बनावट नावाने त्याने खोटा पासपोर्ट बनवला होता. त्याने मलेशिया, पश्चिम आफ्रिका, थायलंड या देशात स्वतःचे नेटवर्क तयार केले होते. तो हॉटेल व्यवसायात सक्रिय झाला होता. त्याने सेनगेलमध्ये नमस्ते इंडिया नावाचे हॉटेल सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.


























































