सस्पेन्स धोनीच्या निवृत्तीचा!

495

>> द्वारकानाथ संझगिरी

धोनीने वनडेतून निवृत्त व्हायचे संकेत दिले आहेत का? हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक, रवी शास्त्रीने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतून तो तसा अर्थ निघतो. पूर्वी तो तडकाफडकी कसोटीतून निवृत्त झाला. इतक्या तडकाफडकी की, काहीतरी काळंबेर आहे असं वाटावं. त्यावेळी डोंगर पोखरून उंदीरही त्या ‘काळय़ा बेऱयाचा’ मिळाला नाही. मग तो वनडे खेळत राहिला. 2019च्या विश्वचषकात तो हट्टाने सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला. हा त्याचा हट्ट होता आणि तो विराट कोहलीने पुरवला, की त्याला चौथ्या क्रमांकावर खेळायचं होतं आणि विराटने त्याला हट्टाने सातव्या क्रमांकावर पाठवलं हेसुद्धा गुलदस्त्यात राहिलं. त्या विश्वचषकातली त्याची फलंदाज म्हणून कामगिरी त्याच्या दर्जाचा विचार करता सामान्य होती. त्याच्या छातीवरचा ‘मॅचविनर’ हा बिल्ला कुठेतरी हरवला होता, तेव्हाचं त्याचं उत्तरायण सुरू झालं होतं. पण आपल्या देशात सर्व महान खेळाडू हे इच्छामरणी भीष्माचार्य असतात. त्यामुळे सर्व जण त्यांच्या इच्छेकडे डोळे रोखून बसले.

विश्वचषकानंतर तो वन डे खेळला नाही. तो देशांतर्गत स्पर्धाही खेळला नाही आणि निवृत्तही झाला नाही. फक्त सस्पेन्स ठेवला गेला – ‘धोनी निवृत्त कधी होणार? किमान वन डेतून होणार का?’ पण सस्पेन्स अति ताणला गेला. त्यातला चार्म निघून गेला. विराटचा संघ जिंकत गेला आणि यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पंतने चार मेणबत्त्याही पेटवल्या नाहीत. ‘पण धोनी हवा होता’ अशी आरोळीही ठोकली गेली नाही. पंत नाहीतर सॅमसन, नाहीतर आणि कुणी, असं भविष्यावर नजर ठेवत पुटपुटलं गेलं. त्यावेळीच कळून चुकलं की, धोनीसाठी वनडेचा दरवाजा उघडा असला तरी त्याची आर्जवं कुणी करणार नाही. कदाचित रवी शास्त्र्ााrने त्याला सद्य परिस्थिती समजावून सांगितली असावी. त्याला तसं मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरभ गांगुलीने सांगण्याची विनंती केली असावी.

पण धोनीसाठी टी-20चा दरवाजा उघडा ठेवला गेलाय. तो आयपीएल खेळणार. या देशात कुणी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही तरी तो आयपील खेळतोच. कारण आज ‘आयपीएल’ हाच मोक्ष आहे. कसोटी किंवा वनडे क्रिकेट नाही. आणि त्यानंतर धोनी पुढच्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियात म्हणजे ऑक्टोबर 2020 मध्ये खेळणार की नाही हे ठरणार. म्हणजे धोनी ठरवणार. कारण निर्णय भीष्म घेतो. निवड समितीही भीष्मापुढे ठेंगणीच असते.

आयपीएलमध्ये धोनीने त्याच्या पूर्वीच्या क्षमतेच्या सत्तर टक्के परफॉर्मन्स द्यायची ग्वाही दिली तर त्याला विश्वचषकात खेळवावे; कारण एक तर शंभर टक्के पंतपेक्षा सत्तर टक्के धोनी या क्षणी तरी चांगला आहे. आणि दुसरं म्हणजे, धोनी यष्टिरक्षक असला की तो बऱयाचदा अर्धा कर्णधारच असतो.

टॉस उडवायला जात नाही आणि शेवटी कर्णधार म्हणून मुलाखत द्यायला येत नाही. एरवी बऱयाचदा क्षेत्ररचना तो लावतो. गोलंदाजीत बदल करतो. गोलंदाजांना काय करायचं ते सांगतो. त्यामुळे एक यष्टिरक्षक सत्तर टक्के फलंदाज आणि पन्नास टक्के कर्णधार मिळून एक धोनी टी-20च्या संघात बसू शकेल. गेल्या विश्वचषकात मला तो फलंदाज म्हणून पूर्वीच्या धोनीच्या सत्तर टक्केही वाटला नव्हता.

मला वाटतं, धोनी वन डेतून निवृत्ती वगैरे जाहीर करणार नाही. आता तो सर्व एकाच क्षणी जाहीर करेल. तो क्षण आयपीएलमध्ये येईल की टी-20च्या विश्वचषकात हे तोच ठरवू शकतो. इतर कुजबुज करू शकतात, टीका करू शकतात, विनंती करू शकतात; पण ‘मी अमुक स्पर्धेसाठी खेळायला तयार आहे’ असं म्हटल्यावर त्याला कुणी टाळू शकत नाही. ते ऑस्ट्रेलियात घडू शकतं. इंग्लंडमध्ये घडू शकतं, पण हिंदुस्थानात नाही. कारण तिथे महान क्रिकेटपटू क्रिकेटपटूच असतात. ते भीष्म नसतात. हंस पक्षी शेवटचं गाणं तोंड न उघडता गातो. त्यावेळी जे सूर उमटतात ते अतुलनीय असतात. म्हणूनच इंग्लिशमध्ये शेवटच्या कामगिरीला ‘स्वॅन साँग’ म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या