अश्विनची आयपीएलमधून निवृत्ती, आता परदेशी लीगमध्ये खेळणार

हिंदुस्थानी संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकत त्याने ही माहिती दिली. अश्विनच्या निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये एका मोठ्या पर्वाचा शेवट झाला असून, आता तो परदेशी लीगमध्ये आपली जादू दाखवणार आहे.

अश्विनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘म्हणतात ना प्रत्येक शेवट ही एका नव्या सुरुवातीची नांदी असते. आज एक आयपीएल खेळाडू म्हणून माझा प्रवास संपतो आहे, पण आता अनेक परदेशी लीगमध्ये खेळण्याचा माझा काळ सुरू होतो आहे.’ अश्विन हा आयपीएल २०२५च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा भाग होता, पण त्याला फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. २० मे रोजी त्याने या हंगामातील शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

अश्विनला सीएसकेकडून रिलीज करण्याच्या चर्चाही सुरू होत्या. तो आपल्या आयपीएल कारकिर्दीत पाच वेगवेगळ्या फ्रेंचायझीकडून खेळलेला आहे. अश्विनने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘इतक्या वर्षांच्या अप्रतिम आठवणी व नात्यांसाठी मी सर्व फ्रेंचायझींना धन्यवाद देतो. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएल आणि बीसीसीआयचे आभार मानतो, ज्यांनी मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आता पुढे जे काही आहे त्याचा आनंद घेण्यासाठी आणि त्याचा लाभघेण्यासाठी मी उत्सुक आहे.’

आयपीएल कारकीर्द

  • रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये एकूण २२१ सामने खेळले असून, त्यांच्या नावावर १८७ बळी (इकॉनॉमी रेट ७.२९) आणि ८३३ धावा (स्ट्राइक रेट ११८) जमा आहेत. मागील हंगामात त्याने सीएसकेसाठी ९ सामने खेळले.
  • अश्विनने २००८ ते २०१५ या काळात सीएसकेकडून खेळत आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली.
  • २०१६ ते २०२४ दरम्यान तो दिल्ली कॅ पिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉ यल्स या संघांकडूनही खेळला.
  • २०२५च्या मेगा लिलावात सीएसकेने अश्विनला ९.७५ कोटी रुपयांच्या मोबदल्यात परत आपल्या संघात घेतले होते.