जाडेजा, चावलाच्या अपयशामुळे चिंता वाढली; चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगचे मत

पहिल्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर पुढील दोन्ही लढतींमध्ये सपाटून मार खाणाऱ्य़ा चेन्नई सुपरकिंग्सला आता आयपीएलमधील भविष्याच्या लढतींबाबत चिंता लागून राहिली आहे. या संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यावेळी म्हणाले, आयपीएल स्पर्धेच्या 12 मोसमांत फिरकी गोलंदाजी ही आमची जमेची बाजू होती, पण या वर्षी त्यामध्येच आम्हाला अपयश येत आहे. रवींद्र जाडेजा व पीयूष चावला यांना सूर अद्याप गवसलेला नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

स्टीफन फ्लेमिंग पुढे म्हणाले, आम्ही आतापर्यंत तीन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये सामने खेळलो. तिन्ही ठिकाणी भिन्न वातावरण होते. आम्हाला जुळवून घेता आले नाही तसेच गोलंदाजीतही आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. मागील दोन लढतींमध्ये झालेल्या चुका सुधाराव्या लागतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

रायुडूची कमी जाणवतेय

चेन्नई सुपरकिंग्सने सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला हरवले. या लढतीत अंबाती रायुडूने अर्धशतकी खेळी करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला, पण दुखापतीमुळे मागील दोन लढतींना अंबाती रायुडू मुकला. याप्रसंगी दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने संघाच्या कामगिरीबाबत आपले मत व्यक्त केले. त्याच्या बोलण्यातून अंबाती रायुडूची कमी जाणवतेय हे प्रकर्षाने दिसून आले. तो यावेळी म्हणाला, अंबाती रायुडूचे संघात कमबॅक झाल्यानंतर संघाचा बॅलन्स चांगला होईल.

अय्यरने केले पृथ्वी, धवनचे कौतुक

दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सला हरवले. दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयात पृथ्वी शॉ (64 धावा) व शिखर धवन (35 धावा) या सलामीच्या जोडीने महत्त्वाची कामगिरी बजावली. कर्णधार श्रेयस अय्यरने दोघांच्या फलंदाजीचे कौतुक केले. तो म्हणाला, पृथ्वी शॉ व शिखर धवन या जोडीने 94 धावांची खणखणीत सलामी दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. तसेच कॅगिसो रबाडा व एनरिच नॉर्जे या गोलंदाजांमुळे संघाला मोठा फायदा होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या