
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि हिंदुस्थानला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यातील मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. टीम इंडियामध्ये एकत्र खेळलेले दोघेही सध्या दोघे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दोघांमधील नाते अधिक घट्ट झालेले आहे. धोनीच्याच नेतृत्वाखाली जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता एका मुलाखतीमध्ये जडेजाने धोनीबाबत अनेक खुलासे केले आहे. पहिली भेट झाली तेव्हा आणि आजही धोनीला भेटताना आपल्याला संकोच वाटतो, असेही जडेजा म्हणाला.
धोनीबाबत बोलताना अनेकदा खेळाडू गोडगोड बोलतात. कमी शब्दांमध्ये त्याचे कौतुक करतात आणि सटकतात. पण धोनीसोबत जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ एकत्र क्रिकेट खेळलेल्या जडेजाने आर. अश्विनसोबत त्याच्या यूट्युब चॅनलवर बोलताना अनेक खुलासे केले. एवढेच नाही तर धोनीसोबतच्या पहिल्या भेटीचाही उल्लेख केला.
विश्लेषण कमी अन्… ‘मिस्टर 360’ एबी डिव्हिलियर्स समालोचकांवर भडकला, RCB vs LSG लढतीदरम्यान काय घडलं?
मी एमएस धोनीला पहिल्यांदा चेन्नईमध्ये चॅलेंजर्स ट्रॉफी 2005 सुरू असताना भेटलो होतो. मी मुंबईहून येत होतो आणि त्याच विमानामध्ये धोनी होता. धोनी बिझनेस क्लासमध्ये बसलेला होता, तर मी इकोनॉमी क्लासमध्ये बसलेलो होतो, असेही जडेजाने सांगितले.
त्यावेळी विमानातील सर्व जण म्हणत होते की धोनी पुढे बसला आहे, पण त्याला भेटायला सगळ्यांनाच संकोच वाटत होता. तसे पाहिले तर, आजही त्याला भेटताना मला संकोच वाटतो. तो जेव्हा चांगल्या मूडमध्ये नसतो तेव्हा तो सांगत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरुन सर्वकाही कळते, असेही जडेजा म्हणाला.
धोनीबाबत जडेजाने आणखी एक गोष्ट सांगितली. त्यावेळी मी लहान होतो. तो धोनी होता आणि मी फक्त त्याला विमानात पाहिले होते, त्याचे केस लांब होते. आमच्या मॅनेजरने सांगितले की, आपल्याला धोनीसोबत विमानतळावरुन टीम हॉटेलमध्ये जायचे आहे. त्याच्यासोबत कसे जायचे असा विचार मनात येऊन मला संकोच वाटला. नशीब चांगले होते, आणि त्याचा फोन कुठे तरी पडला आणि तो थांबला. हीच योग्य वेळ आहे असे वाटले आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला, कारण त्यावेळी त्याच्याशी काय बोलणार असे वाटत होते, असेही जडेजाने सांगितले.