रे टुडे; सत्यजित रे यांच्या दुर्मीळ लघु माहितीपटांचा आनंद लुटा

वास्तववादी सिनेमांचे दिग्दर्शक, निर्माता सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष 2 मेपासून सुरू झाले आहे. यानिमित्त फिल्म डिव्हिजनने सत्यजित रे यांच्या लघुपटांचा खजिना चाहत्यांना खुला केला आहे. ‘रे टुडे’ हा ऑनलाईन महोत्सव 7 ते 9 मे दरम्यान फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावर रसिकांना विनामूल्य बघता येईल. यात रे यांनी नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्यावर तयार केलेला दुर्मीळ माहितीपट, मुन्शी प्रेमचंद यांच्या लघुकथा असलेला रे यांचा दूरचित्रवाणी चित्रपट आदींचा समावेश आहे.

‘रे टुडे’मध्ये ‘सद्गती’ हा ग्रामीण हिंदुस्थानवर आधारित 52 मिनिटांचा  दूरचित्रवाणी चित्रपट बघता येईल. तसेच ‘पिकू’ ही सहा वर्षांच्या मुलीची हृदयस्पर्शी कथा दाखवली जाणार आहे. 24 मिनिटांची ही फिल्म आहे. चित्रपट निर्माता याव्यतिरिक्त सत्यजित रे यांचे विविध पैलू दाखवणारा चरित्रपट ‘रे’ याचा आनंदही रसिकांना घेता येईल. सुकुमार रे यांच्या जीवनावरील ‘सुकुमार रे’ तसेच प्रसिद्ध भरतनाटय़ नृत्यांगना बालसरस्वती यांचे जीवन रेखाटणारा माहितीपट ‘बाला’, बनोदबिहारी मुखर्जी यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा ‘द इनर आय’देखील बघता येईल. या महितीपटांची निर्मिती रे यांनी केलीय. ‘फेलुदा-50 इयर्स ऑफ रे डिटेक्टिव्ह’ हा साज्ञिक चॅटर्जी यांनी तयार केलेला माहितीपटदेखील रसिकांसाठी पर्वणी असेल.

आपली प्रतिक्रिया द्या