नापिकी, पिकांना हमीभाव नाही, कर्जाचा डोंगर यांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. परंतु, सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. उलट सरकारला लाडकी बहिण, लाडका भाऊ दिसतो पण शेतकरी दिसत नाही, अशा शब्दांत रयत शेतकरी संघटनेने मिंधे सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात संतप्त शेतकऱ्यांचा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. सरकारने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर 1 सप्टेंबर रोजी जिल्हाभर रास्ता रोकोचा इशारा रयत शेतकरी संघटनेने मिंधे सरकारला दिला आहे.
सरकारला केवळ लाडकी बहिण, लाडका भाऊ दिसतो पण, शेतकरी दिसत नाही. शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळावे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर 1 सप्टेंबर रोजी जिल्हाभर रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देणारे निवेदन रयत शेतकरी संघटनेच्या वतीने नंदूरबारचे निवासी जिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले आहे.
केवळ 3 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान
तब्बल 4200 शेतकऱ्यांचे 45 कोटींचे ठिबक सिंचनाचे अनुदान अडीच वर्षांपासून रखडले आहे. केवायसी करूनही जिह्यातील केवळ 3 टक्के शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळाले.