रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे निधन, रविवारी मुंबईत केले जाणार अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी वस्त्रोद्योगाला जागतिक ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेमंड समूहाचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचे सुपुत्र गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद माहिती दिली. सिंघानिया यांच्या निधनामुळे हिंदुस्थानी उद्योग विश्वातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे.

विजयपत सिंघानिया यांनी आपल्या कारकिर्दीत रेमंड समूहाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड हा केवळ एक कपड्यांचा ब्रँड न राहता, तो मध्यमवर्गीय हिंदुस्थानींच्या अस्मितेचा भाग बनला. वयाच्या ६७ व्या वर्षी हॉट एअर बलूनमधून ६९ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर जाण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने त्यांना २००६ मध्ये पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरवले होते. याशिवाय त्यांनी हिंदुस्थानी हवाई दलात मानद एअर कमोडोर म्हणूनही सेवा बजावली होती.

आयुष्याच्या उत्तरार्धात विजयपत सिंघानिया यांचे कौटुंबिक वाद आणि मालमत्तेवरून मुलासोबत झालेले कायदेशीर संघर्षही चर्चेत राहिले होते. या संघर्षांमुळे त्यांच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार असून, उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.