
दोन वर्षांपूर्वी दररोजच्या चलनातून बंद केलेल्या 2 दजारांच्या नोटांबाबत मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 31 डिसेंबर 2025 पर्यंत चलनातून बाद झालेल्या 2 हजारांच्या नोटांच्या परताव्याची आकडेवारी जाहीर केली आहे. 19 मे 2023 रोजी या नोटा चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा बाजारात 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा होत्या. आतापर्यंत एकूण 98.41 टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत, मात्र अजूनही 5,669 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडेच असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
RBI च्या आकडेवारीनुसार, 31 ऑक्टोबर 2025 रोजी बाजारात 5,817 कोटी रुपयांच्या नोटा होत्या. ज्या 31 डिसेंबर २०२५ पर्यंत 5,669 कोटींवर आल्या आहेत. याचाच अर्थ गेल्या दोन महिन्यांत केवळ 148 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. जोपर्यंत सर्व नोटा परत येत नाहीत, तोपर्यंत हे चलन ‘लीगल टेंडर’ म्हणून कायम राहील, आरबीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते.
सध्या या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये सुविधा उपलब्ध नाही. आरबीआयने 7 ऑक्टोबर 2023 रोजी ही सुविधा केवळ आपल्या 19 प्रादेशिक कार्यालयांपूरती मर्यादित केली होती. यामध्ये मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे. ज्यांना या कार्यालयांमध्ये जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी इंडिया पोस्टद्वारे (Post Office) नोटा पाठवून त्या खात्यात जमा करण्याची सवलतही आरबीआयने दिली आहे.
2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर रक्कम चलनात असल्याची आरबीआय सातत्याने माहिती देत आहे. सुरुवातीच्या काळात नोटा बदलण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती, परंतु आता केवळ मोजक्याच नोटा परत येत आहेत. ज्यांच्याकडे अजूनही या नोटा आहेत, त्यांनी आरबीआयच्या अधिकृत केंद्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
























































