
गृहकर्जासह इतर कर्जे स्वस्त होण्याची शक्यता इराण युद्धामुळे मावळली आहे. आरबीआयची पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक सोमवार 6 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत होणार आहे. युद्धामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता नाही.
महागाईचा दर कमी झाल्यानंतर आरबीआयने व्याजदरात टप्प्याटप्प्याने कपात केली होती. वर्ष 2025मध्ये व्याजदरात 1.25 टक्क्याची कपात केली आहे. डिसेंबर 2025मध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर पाव टक्क्याने घटवून 5.25 टक्क्यांवर आणला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बैठकीत व्याजदर कायम ठेवण्यात आला होता. आतादेखील त्यात बदल होणार नाही, असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे. आरबीआय बुधवार 8 एप्रिल रोजी व्याजदराबाबत निर्णय जाहीर करणार आहे.
महागाईमुळे व्याजदराबाबत आरबीआय सावध
एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे, की रुपया सध्या 83 रुपया प्रति डॉलरवर आहे. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलवर आहेत. याशिवाय एल निनोचादेखील मान्सूनवर प्रभाव राहणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असून व्याजदराबाबत आरबीआय सावध राहून निर्णय घेईल, असे या अहवालात म्हटले आहे.





























































