
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) मैदानात धावांचे आणि विजयाचे विक्रम करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने आता मैदानाबाहेरही एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, ज्याने संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील आदित्य बिर्ला समूहाने आरसीबी संघ तब्बल १.७८ अब्ज डॉलर्स (सुमारे १६,६६० कोटी रुपये) देऊन खरेदी केला आहे. या व्यवहारासह आरसीबी आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरला आहे.
काही तासांतच राजस्थान रॉयल्सचा विक्रम मोडीत
मंगळवारी सकाळीच ‘राजस्थान रॉयल्स’ संघ १५,३४२ कोटी रुपयांना विकला गेल्याची बातमी आली होती. हा आयपीएलमधील आजवरचा सर्वात मोठा व्यवहार मानला जात होता. मात्र, काही तासांतच आदित्य बिर्ला समूहाने आरसीबीसाठी १६,६६० कोटींची बोली लावून राजस्थान रॉयल्सचा हा विक्रम मोडीत काढला आणि क्रिकेट जगतात खळबळ उडवून दिली.
१८ वर्षांत मूल्यामध्ये १५ पटीने वाढ
२००८ मध्ये जेव्हा आयपीएलची सुरुवात झाली होती, तेव्हा युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने (Diageo) आरसीबी संघ केवळ १११.६ दशलक्ष डॉलर्स (त्यावेळचे सुमारे ४८५ कोटी रुपये) मध्ये विकत घेतला होता. आज १८ वर्षांनंतर या संघाच्या मूल्यात १५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी (२०२५) आरसीबीने त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद पटकावल्याने या संघाच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये प्रचंड वाढ झाली होती, ज्याचा फायदा या करारात दिसून आला.
























































