
सामना ऑनलाईन, मुंबई
पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी साहित्य, संस्कृती, निसर्ग, विज्ञान आणि ऐतिहासिक माहिती देणारी पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. यामुळे पालिका शाळांमध्ये वाचन चळवळ सुरू होणार आहे. याबाबतच्या एक कोटीच्या प्रस्तावाला आज स्थायी समितीची मंजुरी मिळाली.
पालिकेच्या शाळेत मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, कन्नड तमीळ, तेलुगू भाषेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देण्यात येते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना तब्बल 27 प्रकारच्या शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच बाह्य जगाचे, व्यावहारिक, साहित्यिक ज्ञान मिळावे व त्यांची बुद्धिमत्ता आणि आकलन शक्ती वाढावी यासाठी पालिका प्रशासन ग्रंथालयामार्फत अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देते. यामध्ये पालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतील ग्रंथालयात व शिक्षक ग्रंथालयात ही विविध स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये आधुनिक विज्ञान, निसर्ग, वन्यप्राणी यांच्या जीवनावर आधारित पुस्तके, राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती असलेली पुस्तके, चित्रयुक्त पुस्तके व साहित्यविषयक पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत.
अशी होणार पुस्तकांची खरेदी
पालिकेच्या शिक्षण खात्याकडून विविध प्रकाशक, संपादक, पुस्तक विक्रेते, लेखकांकडून माहितीसाठी पुस्तके मागवण्यात आली होती. या पुस्तकांच्या मूल्यांकनासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानंतर ही पुस्तके घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार प्राथमिक शालेय ग्रंथालयासाठी 79 लाख 63 हजार 461 रुपये, माध्यमिक शाळांच्या ग्रंथालयासाठी 22 लाख 68 हजार 776 रुपये, पालिका शिक्षक ग्रंथालयासाठी 2 लाख 95 हजार 653 रुपये अशी एकूण 1 कोटी 5 लाख 27 हजार 890 रुपयांची पुस्तके खरेदी केली जाणार आहेत.
























































