तीन महिन्यांत बांधकाम क्षेत्राला आली तरतरी; कोरोनाचा परिणाम ओसरला

कोरोना महामारीमुळे ढेपाळलेले बांधकाम क्षेत्र हळूहळू सावरत आहे. हे क्षेत्र लॉकडाऊनमुळे एप्रिल ते जूनच्या तिमाहीत आतापर्यंतच्या सर्वात कमी म्हणजेच 22 गुणांच्या नीचांकी पातळीवर गेले होते. पुढे जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत बऱ्यापैकी सुधारणा होऊन या क्षेत्राने 40 गुणांवर मजल मारली आहे.

पुढच्या तिमाहीत आणखी सुधारणा होऊन हे क्षेत्र 52 गुणांच्या आशावादी पातळीवर पोहोचेल, असा निष्कर्ष नाईट फ्रँक, फिक्की आणि नरेडको यांनी संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे.

आर्थिक मंदीचा आधीपासून फटका बसलेले बांधकाम क्षेत्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जमीनदोस्त झाले होते. या क्षेत्राची इतिहासात पहिल्यांदाच 22 गुणांच्या निराशाजनक पातळीवर घसरण झाली. मात्र जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत परिस्थिती सुधारल्याचे नाईट फ्रँक, फिक्की आणि नरेडको यांच्या अहवालात म्हटले आहे.

देशातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होऊन अनलॉकच्या टप्प्यांची अंमलबजावणी झाली तसतशी बांधकाम क्षेत्राला तरतरी आली आहे. त्यातूनच मागील तीन महिन्यांत या क्षेत्राने 40 गुणांपर्यंत प्रगती केली आहे. या अवधीत नवे बांधकाम प्रकल्प तसेच घरांच्या विक्रीत वाढ झाली. पुढच्या तिमाहीत सणासुदीचे दिवस असल्याने रिअल इस्टेटला मोठी ऊर्जितावस्था मिळेल. सरकार व संबंधित संस्थांनी दिलासादायक निर्णय घेऊन या क्षेत्राला उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

घरांच्या विक्रीत 55 टक्क्यांची वाढ
कोरोना महामारीच्या आधीच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत घरांची विक्री 55 टक्क्यांनी वाढली आहे. गृहकर्जांचे कमी झालेले व्याजदर, घराच्या खरेदीवर दिलेल्या सवलती आणि आकर्षक ऑफर्समुळे बांधकाम क्षेत्राला तेजी आली आहे. घरांप्रमाणेच कार्यालयाच्या क्षेत्रातही चांगली सुधारणा झाली आहे, असे नाईट फ्रँक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष शिशिर बैजल यांनी सांगितले. पुढच्या तिमाहीतील सणासुदीच्या हंगामाचा रिअल इस्टेटला आणखी हातभार लागेल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या