
सामना ऑनलाईन, अबुधीबी
रियाल माद्रिद या स्पेनमधल्या दिग्गज क्लबने शनिवारी मध्यरात्री फुटबॉलच्या मैदानात इतिहास रचला. या संघाने यजमान संघ अल इनला 4-1 अशा फरकाने पराभूत करीत सलग तिसऱ्यांदा क्लब वर्ल्ड कप जिंकण्याची करामत करून दाखवली. हे त्यांचे चौथे अजिंक्यपद ठरले हे विशेष.
रियाल माद्रिदने या वेळी या स्पर्धेचे तीन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या बार्सिलोनाला मागे टाकले. स्टार खेळाडू लुका मॉड्रीचने 14व्या मिनिटाला गोल करीत रियाल माद्रिदला 1-0ने पुढे नेले. पूर्वार्धात रियाल माद्रिदने आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर मार्कोस लोरेंटने 60व्या मिनिटाला, सर्जियो रामोसने 78व्या मिनिटाला गोल करीत रियाल माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. याहिया नादेर याने 91व्या मिनिटाला ओन गोल केला. त्यामुळे रियाल माद्रिदचा चौथा गोल झाला. सुकासा शिओतानी याने यजमान संघाचा एकमेव गोल 86व्या मिनिटाला केला.


























































