एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बुधवारी आरोपी हकीमला अटक केली आहे. हकीमने दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. रियासी दहशतवादी हल्लाप्रकरणातील ही पहिली अटक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हकीम दीन हा राजौरी येथील रहीवासी आहे आणि हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 9 जूनला शिवखोडी येथून रियासी जिल्ह्यातून कटराला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून बस दरीत कोसळली. त्यात 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह 33 जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी जंगलात लपून भ्याड हल्ला केला होता. ज्यामुळे बस चालक घाबरला आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले.
गृह मंत्रालयाने दहशतवादी हल्ल्याचे प्रकरण 17 जून रोजी एनआयएकडे सोपवले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचे स्केच प्रसिद्ध केले होते आणि त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. रियासीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा म्हणाल्या की, रियासी येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तो मास्टरमाईंड नाही आहे, मात्र या हल्ल्यात तो सामील होता.