नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात

सामना ऑनलाईन । मुंबई

राखीपौर्णिमा हा सण खास बहीण भावामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. राखीपौर्णिमेला हा सण हिंदुस्तानात श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी (भाऊ बहिणीच्या प्रेमाचा धागा) बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला संरक्षणचं वचन देतो आणि तिला भेटवस्तू देतो. या दिवशी घरात गोडाधोडाचं जेवण केलं जातं.

राखी पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा आणखी एक सण म्हणजे नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा सण. ऐन पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रदेवतेला या दिवशी कोळी बांधव नारळ अर्पण करतात आणि आपल्यावर अशीच कृपादृष्टी ठेवण्याची प्रार्थना करतात. पर्जन्यचक्रात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समुद्राप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी घरात नारळाचा समावेश असलेले गोड पदार्थ केले जातात. या दिवशी ज्या गोड पदार्थाला मानाचं स्थान असतं अशा नारळीभाताची पाककृती.

साहित्य:
३/४ कप तांदूळ, दीड कप पाणी, ३ टेबलस्पून साजूक तूप,१ कप किसलेला गूळ, १ कप ताजा खवलेला नारळ, २ ते ३ लवंगा, १/४ टीस्पून वेलची पूड,
८ ते १० काजू, ८ ते १० बेदाणे

कृती:
प्रथम तांदूळ धुवून चाळणीत अर्धा ते पाऊण तास निथळत ठेवावेत. पातेल्यात २ टेस्पून तूप गरम करून त्यात लवंग घालून काही सेकंद परतावे. त्यात निथळलेले तांदूळ घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे.
तांदूळ परतत असतानाच दुसऱ्या गॅसवर दीड कप पाणी गरम करावे. ते गरम पाणी परतलेल्या तांदळात घालावे. पातेल्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर भात शिजवावा. जेव्हा भात शिजेल त्यावेळी तो भात हलक्या हाताने एका थाळीत काढून मोकळा करावा. त्याचे शिते मोडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

नारळ आणि गूळ एकत्र करावे. भात गार झाला की हे मिश्रण भातात अगदी हलक्या हाताने मिक्स करावे. त्यानंतर जाड बुडाचे पातेले गरम करून त्यात १ टेबलस्पून तूप घालावे. ते तूप गरम झाले की त्यात काजू आणि बेदाणे गुलाबी रंगावर तळून घ्यावे. झाऱ्याने काजू आणि बेदाणे दुसऱ्या वाटीत काढून घ्यावेत.

गॅस मंद करून उरलेल्या तुपात भात-नारळ-गूळ यांचे मिश्रण घालून वेलची पूड घालावी. घट्ट झाकण ठेवून ३-४ वाफा काढाव्यात. मधून मधून हलकेच भात वरखाली करून साधारण १० ते १५ मिनिटे शिजवावे. भात सुरुवातीला थोडा पातळ होईल आणि काही मिनिटांनी आळेल. शेवटची २-३ मिनिटे झाकण न ठेवता भात शिजवा. त्यात तळलेले काजू, बेदाणे घालून सर्व्ह करा. तुमचा नारळी भात तयार आहे.

टीप्स:
१) गूळ-नारळ-भात यांचे मिश्रण शिजवताना गूळ वितळल्याने सुरुवातीला ते पातळ होते. काहीवेळ शिजवल्यावर ते आळत जाईल. तसेच नारळीभात तयार झाल्यावर शेवटची काही मिनिटे झाकण न ठेवता शिजवावे म्हणजे अधिकचा ओलसरपणा निघून जाईल.
२) जर नारळीभात खूप गोड नको असेल तर गूळाचे प्रमाण १ कप ऐवजी पाऊण कप वापरा.
३) जर नारळीभात तयार झाल्या झाल्या लगेच चव पाहिली तर प्रचंड गोड लागेल, पण काही कालावधीनंतर गुळाचा पाक भातात मुरल्याने गोडपणा काही प्रमाणात कमी होतो.
४) तांदूळ परफेक्ट शिजवावा. कमी शिजलेल्या भाताची शिते, गूळाच्या संपर्कात आल्यामुळे कडकडीत होतात. तसेच जास्त शिजलेल्या भाताचा, गूळ आणि नारळ घालून शिजवल्यावर गोळा होतो आणि शिते अखंड राहत नाहीत.