
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कनिष्ठ लिपिकपदाच्या 444 जागांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. ही संपूर्ण भरतीप्रक्रिया आयबीपीएस या राष्ट्रीयीकृत व महाराष्ट्र शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीमार्फत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी पत्रकार बैठकीत दिली.
अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेतील रिक्त जागांमुळे कर्मचाऱयांवर कामाचा ताण होता. त्यामुळे शासनाकडे नोकरभरतीबाबत परवानगी मागितली होती. शासनाकडून आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या कंपनीमार्फत जिल्हा बँकांची भरतीप्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. भरतीप्रक्रियेची परीक्षा घेणाऱया तीन कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी बँकेने आयबीपीएस या राष्ट्रीयीकृत व राज्य शासनाच्या तालिकेवरील नामांकित कंपनीची निवड केली आहे.
70 टक्के जागा सांगलीकरांसाठी राखीव
बँकेत भरण्यात येणाऱया रिक्त जागांपैकी 70 टक्के जागा या सांगली जिह्यातील तरुणांसाठी राखीव असतील, तर उर्वरित 30 टक्के जागांवर जिह्याबाहेरील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. 18 ते 35 वयोगटातील पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येईल. उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क एक हजार रुपये अधिक जीएसटी असे निश्चित करण्यात आले आहे.
ऑनलाइन लेखी परीक्षा होणार
प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर उमेदवारांची ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल. अर्जांची संख्या विचारात घेऊन सांगलीसह कोल्हापूर, पुणे आणि सातारा या प्रमुख केंद्रांवर ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. लेखी परीक्षा 90 गुणांची होईल. मुलाखतीसाठी 10 गुण राहतील. त्यापैकी शैक्षणिक पात्रतेसाठी 5 गुणांचा समावेश आहे. लेखीपरीक्षेनंतर मुलाखत आणि कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार आहे.
आमिषाला बळी पडू नये
नोकरभरतीत पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाणार आहे. परीक्षेत कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही. उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा अफवांना बळी न पडता केवळ स्वतःच्या गुणवत्तेवर या परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी केले आहे.





























































