ठाण्याच्या कोपरी पुलावर ‘लाल चिखल’, कर्नाटकी टोमॅटोने केले चार तास ट्रॅफिक जाम

वाहनांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या ठाण्याच्या कोपरी पुलावर शुक्रवारी अक्षरशः ‘लाल चिखल’ पसरला. कर्नाटकहून अहमदाबादकडे जाणारा टोमॅटोचा ट्रक इस्टर्न एक्स्प्रेसवर उलटला आणि २० टन टोमॅटो रस्त्यावर घरंगळले. उलटलेला ट्रक आणि टोमॅटोचा खच यामुळे मुंबई-नाशिक मार्गावर सुमारे चार तास ट्रॅफिक जाम झाले. दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. वाहतूककोंडीत अडकलेल्यांचे प्रचंड हाल झाले. ट्रक आणि टोमॅटो रस्त्यावरून बाजूला केल्यावर सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

जखमी ट्रकचालक कनप्पा याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. महापालिकेच्या आपत्ती विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन आणि टोमॅटो बाजूला करण्यासाठी जेसीबीला पाचारण करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या