‘हिरवी’ भेंडी ‘लाल’ होणार, दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाचे प्रयत्न यशस्वी

2003

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या प्रयत्नांमुळे ‘रत्नागिरी 4 भात’ व ‘लाल भेंडी’ या वाणांची नोंदणी मंजुर झाली आहे. वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नुकतेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भात पिकाच्या रत्नागिरी 4 तसेच अडेली, तालुका वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथील शेतकरी अनंत दिगंबर प्रभुजगांवकर यांनी विकसित केलेल्या लाल भेंडी या दोन वाणांची वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण कायदा 2001 अंतर्गत नोंदणी मंजुर केली आहे. त्यामुळे लवकरच बाजारात ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण, प्राधिकरण कायदा (2001) अंतर्गत वनस्पती जातींचे संरक्षण, शेतकरी तसेच वनसपती उत्पादकांचे हक्क आणि संरक्षण यासाठी अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये विविध पीक वाणांच्या विकासासाठी व नवीन वाण निर्मितीसाठी पीक पैदासकार शास्त्रज्ञ तसेच शेतकरी यांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच वाणांचे या कायद्याद्वारे संरक्षण केले जाते.

भात पिकाचा रत्नागिरी 4 हा लांबट, बारीक, निमगरवा भात वाण असून 125 ते 130 दिवसात येतो. विद्यापीठांमार्फत या दोन्ही वाणांचे अर्ज करण्यात आले होते. अनंत प्रभुजगांवकर व्यवसायाने शेतकरी असून त्यांनी विकसित कलेला वाण संरक्षित होण्यासाठी विद्यापीठाने विशेश प्रयत्न आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली.

img-20200731-wa0024

लाल भेंडी जातीची लागवड खरीपमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात व उन्हाळयात जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात करावी. ही जात प्रतिकूल तापमान सहन करु शकते. पीक कालावधी 120 ते 130 दिवसांचा असून काढणी सुरु व्हायला 40-50 दिवस लागतात. भेंडीच्या फळांचा रंग लालसर असून लांबी 7 ते 8 इंच व उत्पन्न एक त दीड किलो प्रती झाड आहे. या जातीची लागवड जम्मू आणि कश्मीर वगळता संपूर्ण देशात केली जावू शकते. ही जात पौष्टीक व शिजवल्या नंतर कमी चिकट असल्यामुळे बाजारात तिला जास्त मागणी आहे.

या पीक वाणांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत तसेच संशोधन संचालक, डॉ. पराग हळदणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुराद बुरोंडकर, डॉ. व्ही. व्ही. दळवी, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि वनिकी प्रकल्प, डॉ. बी. डी. वाघमोडे, प्रभारी अधिकारी, प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी आणि डॉ. संजयकुमार तोरणे, संशोधन उपसंचालक यांनी यासंदर्भात प्रयत्न केले. या पीकांच्या नोंदणामुळे राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर बाजारात जास्त मागणी येईल व शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या