
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या जागेवर असलेल्या शिवडी बीडीडी चाळींचा विकास राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणानुसार करावा तसेच शिवडी पूर्व पट्टय़ातील झोपडय़ांचा पुनर्विकास त्याच जागी करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी शिवसेनेने आज मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे केली. त्याचप्रमाणे शिवडी व काळाचौकी परिसरात विविध पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारल्या जाव्यात, असाही आग्रह धरण्यात आला आहे.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नाने मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगामुतू यांच्यासमवेत आज बैठक झाली. त्या बैठकीत शिवडी-काळाचौकी प्रभाग क्रमांक 206 मधील विविध मुद्दय़ांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
शिवडी पूर्व पट्टय़ातील सन 2000 च्या सर्व्हेनुसार पात्र झोपडय़ांना संरक्षण देण्यात यावे असा मुद्दा मांडतानाच त्या झोपडय़ांचा पुनर्विकास राज्य शासनाच्या गृहनिर्माण धोरणाप्रमाणे किंवा पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहत्या जागीच करणे गरजेचे आहे, असे अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला शिवसेना उपनेते-आमदार मनोज जाममसुतकर, नगरसेवक सचिन पडवळ आणि रमाकांत रहाटे आदी उपस्थित होते.
हे मुद्दे मांडले गेले
- शिवडी पूर्व येथील हाजी बंदर रोड, मेसन रोड, फॉर्सबेरी रोड, गिरीनगर शिवडी किल्ला रोड, कोळसा बंदर, जय भीम नगर, अमन शांती नगर, रामगड परिसरातील रस्त्यावर स्ट्रीट लाईट पोलची व्यवस्था करावी.
- जय भीम नगर, अमन शांतीनगर, कोळसा बंदर या परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करावे.
- हाजी बंदर रोड परिसरात चालू असलेल्या डंपर वाहतुकीमुळे होणारी धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी रस्ता पाण्याने धुण्यात यावा.
- शिवडी पूर्व पट्टय़ात पर्जन्य जलवाहिनी तसेच मलनिःसारण वाहिनी टाकाव्यात.


























































