
बेस्ट बस आगारांमध्ये पार्क करण्यात येणाऱया स्कूल बसेसच्या पार्किंग शुल्कात कपात करण्यात येणार आहे. शालेय बस संघटनेमार्फत बेस्ट बस आगारांमध्ये पार्क करण्यात येणाऱ्या बसेसच्या पार्किंग शुल्कात कपात करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार याप्रकरणी आज झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन पार्किंग दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या 26 वाहनतळांपैकी 14 वाहनतळांचा 50 टक्क्यांहून कमी वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर या वाहनतळांच्या 500 मीटरच्या परिसरात आढळून येणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर अधिक कठोर कारवाई करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
बेस्टमधून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाण्याची सुविधा
दादरमधील राम गणेश गडकरी चौकात असणाऱ्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीतील सार्वजनिक वाहनतळाचा अधिक प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने या चौकापासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बेस्ट बसचा नवीन आणि नियमित फेऱ्या असणारा मार्ग तत्काळ सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे भाविकांना त्यांचे खासगी वाहन महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळ येथे पार्क करून बेस्ट बसद्वारे सिद्धिविनायक मंदिरात जाता येणार आहे.



























































