
धारावी येथे 1999 साली लागलेल्या भीषण आगीत बाधित झालेल्या ‘राजीव गांधी एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थे’तील 436 पात्र झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी देवनार येथील सर्व्हे क्रमांक 93 मधील सुमारे 11 हजार 659 चौरस मीटर शासकीय जमीन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) देण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याने हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता.

























































