स्टार प्रचारक पदावरून ठाकूर, वर्मा यांना हटवा, निवडणूक आयोगाचा दिल्ली भाजपला दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यावर निवडणूक आयोगाने बुधवारी कडक कारवाई केली. दिल्लीत विधानसभा निवडणूक तोंडावर असताना आपल्या या दोघांना भाजपने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवावे असे आदेशच निवडणूक आयोगाने दिले आहेत. देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, गोळ्या घातल्या पाहिजेत, असे बोलणाऱया अनुराग ठाकूर यांच्यावर भाजप काय पाऊल उचलते ते आता महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या या दोन्ही खासदारांनी गेल्या काही दिवसांत प्रचारसभांमध्ये वारंवार आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दिल्लीतील रिठाला येथून निवडणूक मतदारसंघात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्यासोबत प्रचारसभेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘देशातील गद्दारांना गोळ्या घातल्या पाहिजेत’ असे विधान केले होते. त्यांनी उपस्थित मतदार प्रेक्षकांनाच विचारले होते की, देशाच्या गद्दारांना…? भाजप कार्यकर्ते म्हणाले, ‘गोळ्या घाला…’ दुसरीकडे, भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱया शाहीन बाग येथील निदर्शनांबाबत बोलताना प्रक्षोभक विधाने केली होती. ते म्हणाले होते की, तेथे शाहीन बागमध्ये लाखो लोक जमा होत आहेत. दिल्लीच्या लोकांना आज विचार करावा लागेल. एक निर्णय घ्यावा लागेल. ते तुमच्या घरात घुसून आयाबहिणींवर अत्याचार करतील, त्यांना ठार मारतील… अजूनही वेळ गेलेली नाही. उद्या मोदी आणि अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत… असे वर्मा म्हणाले होते.

कर्नाटक मंत्र्याचे ठाकूर यांना समर्थन

दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यातच मंगळवारी एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘देशद्रोह्यांना बिर्याणी नाही, गोळ्या घातल्या पाहिजेत’ असे प्रक्षोभक विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरात टीकेचे मोहोळ उठलेले असतानाच कर्नाटक सरकारमधील एक मंत्री सी. टी. रवी यांनी अनुराग ठाकूर यांच्या विधानाचे समर्थन एका ट्विटद्वारे केले आहे. ते म्हणाले की, ठाकूर यांच्यावर टीका करणारे हे तेच लोक आहेत, ज्यांनी दहशतवादी अजमल कसाब आणि याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता.