
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा कालावधी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता संपुष्टात येणार आहे. यानंतर सर्व राजकीय पक्ष तसेच उमेदवारांनी प्रचार साहित्य तत्काळ हटवावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचार बंदीचा कालावधी मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर असणार आहे. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक प्रचार साहित्य न हटविल्यास या प्रकरणी मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच, प्रचार साहित्य काढण्याकरिता प्रशासनाला आलेल्या खर्चाचा समावेश संबंधित उमेदवारांच्या खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल, असेदेखील डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
समाजमाध्यमांवरही निर्बंध
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे तसेच मुद्रित माध्यमाद्वारेदेखील प्रचारावर बंदी राहील. यामध्ये मेसेजिंग अॅप्स तसेच यूटय़ूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, एक्स इत्यादी सर्व समाजमाध्यम प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे.





























































