छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; कोल्हापुरात मराठा समाजाची मागणी

आरक्षणासंदर्भात मराठा समाजाविरोधात बेताल वक्तव्य करून, समाजात फूट पाडणारे मंत्री छगन भुजबळ यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच उद्या (बुधवारी) दुपारी भुजबळांच्या प्रतिमेचे प्रतीकात्मक दहन करून, निषेध करण्यासह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचेही समन्वयकांकडून सांगण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार निर्णय घेत असताना, त्यांचे मंत्री छगन भुजबळ वेगळी भाषा करतात. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का ? ज्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना फसविले ते मंत्रिमंडळात असतानाही सरकारविरोधात भूमिका घेतात, याचा जाहीर निषेध करत, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

मनोज जरांगे-पाटील आता गल्लीबोळातील नेते नाहीत, तर ते मराठय़ांचे नेते आहेत. त्यांना भेटायला आलेल्या माजी न्यायमूर्तींनी त्यांचा उल्लेख ‘सर’ असा केला असेल, तर त्याला भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय सर्व मंत्र्यांना बंधनकारक असतो. त्यामुळे आरक्षणाबाबत निर्णयाविरोधात वक्तव्य करणाऱया भुजबळांना मराठा समाजाचा राग आहे हे दिसून येते. भुजबळांना नाशिकमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांनी यावेळी दिला. यावेळी दिलीप देसाई, ऍड. बाबा इंदुलकर, उदय लाड, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.