शाळा परिसरातील पानटपऱ्या तातडीने हटवा; राज्य बालहक्क आयोगाचे पोलीस महासंचालकांना पत्र

प्रातिनिधिक फोटो

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या परिसरात 100 मीटर अंतरावर पानटपऱ्यांवर बंदी आहे. तरीही अनेक शाळांच्या आजूबाजूला तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जाते. ही बाब अतिशय गंभीर असून शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व पोलीस महानिरीक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई) दीपक कुमार पांडे यांच्याकडे केली आहे.

मुंबईत अनेक शाळा नागरी वस्तीच्या परिसरात आहेत. शिवाय बहुतांश ठिकाणी शाळा बाजार, दुकानांनी वेढलेल्या आहेत. या दुकानांमध्ये, स्टॉलमध्ये काही ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा, पान असे पदार्थ सर्रासपणे विकले जातात. विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होऊन ते व्यसनाच्या आहारी जात आहेत. शाळकरी मुले तंबाखू, गुटख्याच्या आहारी जातात. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी अॅड.  सुशीबेन शाह यांनी केली.

19 मेच्या रात्री पुणे येथील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवत बाईकला धडक दिली होती. या दुर्घटनेत बाईकवरील दोघांचा मृत्यू झाला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी तसेच अल्पवयीन मुलांमधील व्यसनाधीनता रोखण्यासाठी शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ व मद्य विक्रीवरील बंदीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज्य बालहक्क आयोगाने केली आहे.

युवकांना तंबाखूच्या भीषण परिणामांची माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळा व महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. 100 यार्डांच्या आत अशा पदार्थांची विक्री न करण्याविषयी कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचीदेखील आहे, असेही
अॅड. शाह यांनी स्पष्ट केले.