राज्य निवडणूक आयुक्तांना हटवा! नाना पटोले यांनी केली मागणी

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतांच्या निवडणुकांमध्ये संभ्रम निर्माण करून ऐनवेळी निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेणाऱया राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा, अशी जोरदार मागणी काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केली.

नाना पटोले यांनी राज्यघटनेच्या 243 (क) प्रमाणे प्रस्ताव आणून राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्यासाठी हा प्रस्ताव चर्चेला घेण्याची जोरदार मागणी केली. पटोले म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मतदार याद्या वेळेत घोषित होऊ शकल्या नाहीत. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनीदेखील आयोगावर टीका केली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक प्रक्रिया राबवताना बेकायदेशीर कृत्य केले असून, त्यांना पदावरून दूर करण्यासाठी निर्देश द्यावेत.
नियमाचा दाखला देत अध्यक्षांनी मागणी फेटाळली

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांनी 243 (क) अन्वये आणलेल्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होऊ शकत नाही. कारण राज्य विधिमंडळाला राज्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा अधिकार नाही. घटनेच्या कलम 123 आणि कलम 124 मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाला पदावरून काढता येते. मात्र, हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना हटवण्यासाठी असलेली घटनात्मक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगालादेखील हीच प्रक्रिया राबवून हटवता येते, त्यामुळे या विषयावर विधानसभेत चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत अध्यक्षांनी मागणी फेटाळली.