
सामना ऑनलाईन । बीड
बीड जिल्हय़ात सुरू असलेल्या गर्भाशय काढण्याच्या दुकानदारीची गंभीर दखल केंद्राच्या आरोग्य खात्याने घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. हे पथक गावोगावी फिरून अहवाल तयार करणार असून तो आरोग्य विभागाला पाठवण्यात येणार आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला की जिल्हा ओस पडतो. मासिक पाळीच्या गर्तेत अडकायचे नसेल तर गर्भाशयाची पिशवी काढणे चांगले म्हणून ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या हजारो महिलांचे गर्भाशयच काढण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले. याची केंद्राच्या आरोग्य खात्याने गंभीर दखल घेऊन राज्य सरकारकडे अहवाल मागितला. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी आरोग्य सचिवांच्या आदेशावरून चार डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले. हे पथक गावोगावी फिरून महिलांशी बोलून वास्तवदर्शी अहवाल तयार करून आरोग्य विभागाला सादर करणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिह्यात गर्भाशय काढण्याचा अक्षरशः बाजारच मांडण्यात आला आहे. महिलांना आरोग्यविषयक, विशेषतः मासिक पाळीविषयी कोणतीही तक्रार असली तरीही गर्भाशय काढण्याचा सल्ला खासगी रुग्णालयात दिला जातो. त्यातच दरवर्षी बीड जिल्हय़ातून दोन लाख महिला ऊसतोडणीसाठी जातात. कामामध्ये मासिक पाळीची अडचण नको, त्यामुळे दोन-तीन अपत्ये झाली की गर्भाशयाची पिशवी काढून टाकली जाते.
हो, समिती नेमली आहे – डॉ. थोरात
आरोग्य सचिवांच्या आदेशानुसार डॉ. इंद्रजीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांचे पथक नेमण्यात आले आहे. हे पथक गावोगावी जाऊन महिलांची चौकशी करेल. ज्या महिलांचे गर्भाशय काढण्यात आले त्यांचा आजार याचा अभ्यास करेल. गरज नसताना पिशवी काढली गेली का, कोणी काढली त्या डॉक्टरचीही चौकशी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास त्या रुग्णालयाला सीलही केले जाईल असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
एकाच रुग्णालयात 26 शस्त्रक्रिया
केंद्रीय आरोग्य सचिवांच्या आदेशावरून नेमण्यात आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने आजच आपल्या कामाला सुरुवात केली. हजार लोकसंख्या असलेल्या एका गावाला या पथकाने भेट दिली. या गावात 18 ते 25 वयोगटातील 56 महिलांचे गर्भाशय काढण्यात आले आहे. या 56 पैकी तब्बल निम्म्या म्हणजे 26 शस्त्रक्रिया एकाच रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. जिल्हय़ातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढण्याचा गोरखधंदा सुरू असून हे पथक त्याचीही चौकशी करून आपला अहवाल आरोग्य विभागाला पाठवणार आहे.
‘सामना’ने केला होता पर्दाफाश
बीड जिल्हय़ातील गर्भाशय काढण्याच्या दुकानदारीचा ‘सामना’ने आठ वर्षांपूर्वीच पर्दाफाश केला होता. 6 जून 2012 रोजीच्या अंकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याचवेळी आरोग्य खात्याने दखल घेऊन कारवाई केली असती तर या आठ कर्षांत लाखो महिलांच्या गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या गेल्या नसत्या.



























































