मिसेस मुख्यमंत्री असत्या तर असे वक्तव्य केले नसते, रेणुका शहाणे यांची अमृता फडणवीस यांना चपराक

6974

सुशांतसिह राजपूत यांच्या दुःखद मृत्यूचे राजकारण करू नका आणि मुंबईची निंदा करण्यासाठी या प्रकरणाचा वापर करू नका, अशा शब्दात प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा समाचार घेतला. त्या मिसेस मुख्यमंत्री असत्या तर असे वक्तव्य केले नसते अशा शब्दात रेणुका शहाणे यांनी चपराक दिली.

तर मुंबई असुरक्षित वाटत असल्यास अमृता फडणवीस यांनी राज्य सोडून जाणे हाच उपाय असल्याचा सणसणीत टोला परिवहनमंत्री अनिल परब यांनी मारला. मिसेस मुख्यमंत्री हे बिरुद गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अमृता फडणवीस ट्विटच्या माध्यमातून सतत त्रागा व्यक्त करीत असतात. अभिनेता सुशांतसिह राजपूतचा आत्महत्येचा संबंध मुंबईच्या सुरक्षिततेशी जोडत त्यांनी ट्विट केले होते.

अमृता फडणवीस यांना सणसणीत उत्तर
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमृता फडणवीस यांचा ट्विटच्याच माध्यमातूनच समाचार घेतला आहे. ‘सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करून विनाकारण मुंबई व मुंबईकरांची निंदा करू नका. काही खात्रीशीर माहिती असेल तर मुंबई पोलिसांना देऊन त्यांना तपासकामात मदत करा.’

ट्रोलर्सनाही फटकारले
अमृता यांची बाजू घेऊन ट्रोल करणार्यांरनाही रेणुका शहाणे यांनी झापले आहे. अमृता या मिसेस मुख्यमंत्री असत्या तर मुंबईबद्दल त्यांनी कोणत्याही परिस्थितीत असे वक्तव्य केले नसते याकडे ट्रोलर्सचे लक्ष वेधले. एल्फिन्स्टन पूल देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोसळला होता. त्यात अनेक मुंबईकरांचे जीव गेले होते. तेव्हा मुंबई असुरिक्षत किंवा संवेदनाहीन असल्याचे अमृता कधी म्हणाल्या नव्हत्या.

तर राज्य सोडून जावे
परिवहन मंत्री अनिल परब यांनीही अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. भाजपची सत्ता गेली म्हणून अमृता फडणवीस यांना आता असुरक्षित वाटू लागले आहे. तसे असेल तर त्यांच्यासाठी हे राज्य सोडून जाणे हाच एक उपाय असू शकतो असा सल्ला अनिल परब यांनी दिला. अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटण्यासारखे काय घडले आहे. त्याच पोलिसांची सुरक्षा व्यवस्था आज त्या घेऊन फिरत आहे असा टोलाही त्यांनी मारला.

आपली प्रतिक्रिया द्या