वसाहत अधिकाऱ्यांबाबत काढलेले नियमबाह्य परिपत्रक रद्द करा; म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

वसाहत अधिकारी विभागातील दैनंदिन व संपूर्ण कामकाजाच्या सुसूत्रीकरणसंदर्भात बेकायदेशीररीत्या नव्याने काढलेले परिपत्रक रद्द करण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

सहाय्यक आयुक्त शहर यांच्या स्वाक्षरीने वसाहत अधिकारी विभागाच्या दैनंदिन व संपूर्ण कामकाजाच्या अनुषंगाने सुसूत्रीकरण करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सहाय्यक आयुक्त शहर हे परस्पर वसाहत अधिकारी खाते अथवा कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) यांच्या कर्तव्यसूचीत बदल करू शकत नाहीत. सदर बाब ही त्यांच्या अधिपत्याखालील कामकाजाचा भाग नाही तसेच मनपाच्या कोणत्याही धोरणात्मक सेवाशर्तीत बदल करायचे असल्यास मान्यताप्राप्त युनियन यांना औद्योगिक कलह कायद्यातील 9 अ च्या तरतुदींनुसार चर्चा करून सर्व युनियनने संमती दिल्यानंतर बदल करणे आवश्यक आहे. वसाहत अधिकारी खाते व कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) यांची दैनंदिन कामकाजाची कर्तव्यसूची ही पूर्णपणे वेगवेगळी आहे व या दोन्ही खात्याचा परस्परांशी दुरान्वये संबंध नाही, असे बाबा कदम यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी प्रशासनाने ज्या ज्यावेळी अभियंता कर्मचाऱयांना इतरत्र कामकाज करण्यासंबंधी आदेश काढले आहेत त्या प्रत्येक वेळी स्वतःच्या कर्तव्यसूचीतील कामकाजाव्यतिरिक्त इतरत्र काम करण्यास नकार दिलेला आहे. यावेळी मात्र समर्थन दर्शविल्यासारखे वाटते व हे कर्मचाऱयांमध्ये भेदभाव तसेच असमानता निर्माण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट दिसते. म्हणून सहाय्यक आयुक्तांनी प्रसारित केलेले परिपत्रक त्वरित रद्द करावे अशी मागणी कदम यांनी केली.

कर्मचाऱयांमध्ये असंतोष
पालिकेतील रचना व कार्यपद्धती खाते यांनी वसाहत अधिकारी खाते यांची दैनंदिन कामकाजाच्या अनुषगांने बनवलेली पदोन्नती साखळी व कर्तव्यसूची याबाबत खात्यातील कोणत्याच प्रवर्गातील कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाची तक्रार नाही, असे असताना नियमबाह्य कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) आणि सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाने) यांची वरिष्ठ अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही अनाकलनीय आहे. या नियुक्तीमुळे वसाहत अधिकारी खात्यात कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) या खात्याचा नाहक हस्तक्षेप होणार आहे व यामुळे वसाहत अधिकारी खात्यातील कर्मचाऱयांवर प्रशासन एकप्रकारे अविश्वास दर्शवित असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे वसाहत खात्यातील कर्मचाऱयांमध्ये असंतोष निर्माण झाला असून दैनंदिन कामकाजात व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे.