या कॅफेत लोक साप आणि विंचवांसोबत पितात चहा!

21

सामना ऑनलाईन । मुंबई

बातमीचा मथळा वाचून किळस नक्कीच दाटून आली असेल. मथळा असा असला तरी प्रत्यक्ष बातमी वेगळी असेल, असाही विचार तुमच्या मनात आला असेल. पण थांबा.. मथळा आणि बातमी अगदी तंतोतंत जुळत आहे. जगात असाही एक कॅफे आहे, जिथे साप आणि विंचू तुमचे चहासोबती असतात.

या कॅफेचं नाव रेप्टाइल थीम्ड कॅफे असून तो कंबोडिया येथे आहे. कंबोडियात यापूर्वी कॅट कॅफे ही संकल्पना लोकप्रिय झाली आहे. अशा प्रकारच्या कॅफेमध्ये तुम्ही अनेक मांजरींसोबत चहा- कॉफीचा आस्वाद घेता. पण, चिया रॅती नामक एका महिलेने चक्क सरिसृपांचा वावर असलेला कॅफे उघडला आहे. या कॅफेत विविध प्रकारचे साप, विंचू, सरडे आणि तत्सम जीव वावरतात. तुम्हाला चहा प्यायचा असेल तर तिथल्या टेबलवर तुम्ही बसू शकता. त्यावेळी तुमच्या आसपास यातला एखादा प्राणी असतोच.

चिया रॅती यांना सरिसृपांविषयी खास जिव्हाळा आहे. त्या जिव्हाळ्यापोटीच त्यांनी हा कॅफे साकारला. रॅती यांच्या म्हणण्याप्रमाणे, अनेकजण साप विंचवांना घाबरतात. पण, त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भीतीचा भाग सोडला तर ते अत्यंत सुंदर प्राणी आहेत. माझ्या कॅफेमध्ये जेव्हा ग्राहक यांना पाहतात, तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया भीतीचीच असते. पण, जेव्हा हे प्राणी कोणताही उपद्रव देत नाहीत, असं त्यांच्या लक्षात येतं, तेव्हा ते हळूहळू त्यांच्यासोबत बसून चहा-कॉफीचा आस्वाद घेतात. माझा मूळ हेतूच हा आहे की, या प्राण्यांबद्दलची लोकांची भीती जाऊन त्यांनीही या प्राण्याबद्दल प्रेम वाटावं, असं रॅती यांचं म्हणणं आहे.

 summary- reptile themed cafe in Cambodia

आपली प्रतिक्रिया द्या