अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे, बाप्पाची मूर्ती अन् लेझीम… कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव’ चित्ररथाने जिंकली मने

देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन पार पडले. लष्करी संचलनानंतर कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारे विविध राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले. कर्तव्य पथावरील या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘गणेशोत्सव – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या विषयावर आधारित असलेल्या या चित्ररथाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे आगमन होताच सर्वांच्याच नजरा त्यावर खिळल्या. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम चित्ररथामध्ये दिसला. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात जनतेला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेल्या गणेशोत्सवापासून ते आजच्या काळात स्थानिक कारागीर आणि कुटीर उद्योगांना आधार देणाऱ्या या उत्सवाचे महत्त्व यात अधोरेखित करण्यात आले.

चित्ररथाच्या दर्शनी भागात ढोल वाजवणारी महिला होती. सोबत भगवान गणेशाची भव्य आणि पर्यावरणपूरक मूर्ती विराजमान होती. मध्य आणि मागील भाग कारागिरांच्या कौशल्याचे मूर्ती घडवताना दाखवण्यात आले आहे. यातून हा उत्सव हजारो ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेला कसा आधार देतो, हे दिसून आले.

रथाच्या दोन्ही बाजूला सुरू असलेल्या ‘ढोल-ताशा’ पथकांच्या दणदणाटाने आणि लयबद्ध वादनाने गणेशोत्सव थेट देशाच्या राजधानीत अवतरला होता. यावेळी लेझीम खेळणाऱ्या महिला आणि भगवे झेंडे उंचावणारे पुरूषांनीही सर्वांचे लक्ष वेधले. कर्तव्य पथावर उपस्थित नेत्यांनी, प्रेक्षकांनी हात उंचावत आणि टाळ्या वाजत महाराष्ट्राच्या चित्ररथाचे स्वागत केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, दिल्लीत पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला यंदा प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच दोन युरोपियन नेते सहभागी झाले. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.