
शिंदे गटात सारे काही आलबेल नाही हे आता समोर येऊ लागले आहे. धाराशिव येथे रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर नाराजी नाट्य पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे एका खासगी कार्यक्रमासाठी धारशिव येथे आज दाखल झाले. याआधी तानाजी सावंत समर्थकांना पोलिसांनी नजरकैद केल्याचे बोलले जात आहे. तसेच विमानतळावर तानाजी सावंत समर्थकांना शिंदेंच्याजवळ जाण्यापासून पोलिसांनी रोखल्याचेही कळते आहे.
धाराशिवमध्ये शिंदे गटात तानाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांना वेगळे पाडले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तानाजी सावंत गेल्यावेळी धाराशिवचे पालकमंत्री होते. मात्र सध्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिवचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे, त्यांच्या मागण्यांचा विचार केला जात नाही अशी चर्चा आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाऊ नये अशी तानाजी सावंत यांच्या समर्थकांची इच्छा होती. मात्र त्यांच्या विनंतीला डावलून भाजपसोबत युती करण्याचा मार्ग स्वीकारण्यात आला. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना जिल्हा परिषद अध्यक्ष तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषा गायकवाड यांना उपाध्यक्ष करण्यात आले. यामुळे तानाजी सावंत समर्थकांची नाराजी वाढत गेली.
एकनाथ शिंदे हे आज धाराशीव येथे एका खासगी कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मिळताच तानाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांसोबत होणारा व्यवहार हा नाराज कार्यकर्ते शिंदे यांना भेटून मांडणार होते. त्यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी अविनाश खापे पाटील आणि शिराढोणचे नितीन पाटील यांना सकाळी घरातून ताब्यात घेत शिराढोण पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांना बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांच्या घरावरही पोलिसांचा कडेकोट पहारा लावला गेला.
तसेच एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी विमानतळाच्या गेटवरच अडवले. यामुळे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. घडलेल्या प्रकारावर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
या सर्व प्रकरणामागे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा हात असल्याचा आरोप शिंदे गटाचे यागेश केदार यांनी केला आहे.






























































