कागदोपत्री जास्त विद्यार्थी दाखवले; मालेगावातील निवासी अंधशाळा बंद

मालेगावच्या रावळगाव नाका परिसरात कागदोपत्री जास्त विद्यार्थी दाखवून शासकीय अनुदान लाटणारी निवासी अंधशाळा बंद करण्याचा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झाला.

रावळगाव नाका परिसरातील अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी संगनमताने सात विद्यार्थी असताना 50 विद्यार्थी दाखवले. 24 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असल्याचे भासवून त्यांचे वेतन व वसतिगृह अनुदान घेत अनेक वर्षांपासून शासनास लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती द्यानद्यान यांना मिळाली. त्यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली. मात्र, ती दिशाभूल करणारी असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांना सखोल चौकशीचे आदेश दिले.