ओळखपत्राशिवाय कळसूबाई शिखरावर प्रवेश नाही; बारी, जहागीरदारवाडी ग्रामसभेत ठराव

महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसूबाई शिखरावर जाणाऱया प्रत्येक पर्यटकाला आणि भाविकाला यापुढे सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश करताना आवश्यक ते ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. या ओळखपत्राची तपासणी करून आणि नोंदणी केल्यानंतरच कळसूबाई शिखरावर जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तसा ठराव बारी आणि जहागीरदारवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींच्या संयुक्त ग्रामसभेने एकत्रितरीत्या घेतला आहे.

कळसूबाई शिखर ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते, त्या बारी आणि जहागीरदारवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींची एकत्रितरीत्या ग्रामसभा पार पडली. त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती बारी गावच्या सरपंच वैशाली खाडे आणि जागीरदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे यांनी संयुक्तरीत्या दिली आहे. महाराष्ट्रातल्या या सर्वोच्च शिखरावर वर्षभरात अनेक पर्यटक आणि भाविक येत असतात. नवरात्रोत्सवात दसऱयाच्या दरम्यान गडावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. तसेच वर्षभरात पर्यटकांची आणि गिर्यारोहकांचीही गर्दी कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी झालेली असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि इतर बाबींचे महत्त्व पाहाता वरील निर्णय घेण्यात आला आहे.

आता पावसाळा सुरू झाल्याने कळसूबाई शिखराचे सौंदर्य़ पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे; तर देशभरातून पर्यटक कळसुबाई शिखराला भेट देण्यासाठी येत असतात. त्यातच काही हौशी पर्यटकसुद्धा येतात. कळसूबाई ट्रेक करणे म्हणजे मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा आनंद, पक्षांचा चिवचिवाट, तसेच स्थानिकांनी राखून ठेवलेल्या झाडे-झुडपे, डोंगरावरून वाहणारे असंख्य छोटे मोठे धबधबे, झरे पाहण्याचा मोठा आनंद मिळतो. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक याचे भान ठेवताना दिसत नाहीत. त्यासाठी कळसूबाई किंवा सह्याद्रीत कोठेही फिरताना एक नियमावली असावी, त्यादृष्टीने ट्रेकला जात असताना जोरजोरात ओरडणे, स्पीकर वाजवणे, शिखरावर जाऊन नाच-गाणे करणे, अनपेक्षित रील्स बनवणे, मद्यपान, धूम्रपान करणे, शिखरावर कचरा करणे, अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. आता कळसूबाई शिखरावर जाताना प्रत्येक पर्यटकाला आपले पूर्ण पत्ता असलेले आधार कार्ड किंवा पूर्ण पत्ता असलेले कोणतेही छायाचित्र असलेले शासकीय ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. प्रत्येक पर्यटक व त्यांच्या गाडीची तपासणी केली जाणार आहे. प्लॅस्टिकचा वापर करण्यास मनाई करण्यात येणार आहे. सोबतच प्रवेश देण्यासाठी प्रतिव्यक्ती 30 रुपये शुल्क आकारणी गावातील समितीद्वारे केली जाणार आहे.

कळसूबाई शिखरावर जाणाऱया प्रत्येक पर्यटक व भाविक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश करताना आवश्यक ते ओळखपत्र तपासून व नोंदणी करून प्रवेश दिल्यास शिखरावर घडणाऱया अनुचित प्रकारांना आळा बसेल. दुर्दैवाने झालेल्या अपघातावेळी ओळख तपासण्याच्या कामी त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण काही वर्षांपूर्वी एका तरुण मुलीने या ठिकाणी आत्महत्या केली होती. तिची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. तसेच नियम पालन करणाऱया पर्यटकांना यातून दिलासा मिळेल.
– पंढरीनाथ खाडे, सरपंच, जहागीरदारवाडी