राजकीय हस्तक्षेपाखाली जमीनीचा फेरफार, सेवानिवृत्त तलाठ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरातील सर्व्हे ६१३ मधील ज्ञानोपासक गृहनिर्माण सोसायटीच्या १०० कोटीच्या जागेबाबत राजकीय हस्तक्षेपाखाली झालेल्या फेरफार प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी सेवानिवृत्त तलाठी दत्ता कदम यांना अटक केली आहे. या प्रकरणी एकूण ५ जणांविरुद्ध ४२० कलमांतर्गत सहा महिन्यापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. त्यातील दत्ता कदम यांना एकट्यालाच अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपी उजळ माथ्याने अद्यापही फिरत आहेत.

परभणी शहरालगत असलेल्या सव्र्हे नं. ६१३ मधील १६ एकर ८ गुंठे जमीन ही शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी खरेदी केली होती. धनादेशाद्वारे शेतमालकाला पेमेंट करण्यात आले होते. ज्ञानोपासक महाविद्यालयाचे कर्मचारी तथा या गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक बुलंगे यांच्या हातावर हा व्यवहार झाला होता. परंतु त्यानंतर कालांतराने बुलंगे यांचे संमत्तीपत्रक घेण्यात येऊन ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांच्या नावे या जमीनीचा फेरफार झाला. हा फेरफार तात्कालीन तलाठी दत्ता श्रीरंग कदम आणि मंडळाधिकारी पवार यांनी केला होता. ज्ञानोपासक महाविद्यालयाचे तात्कालीन प्राचार्य व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. बाबुराव सोळंके यांनी या प्रकरणात लेखी तक्रार देऊन पोलिसात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

पोलिसांनी प्रारंभी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर डॉ. सोळंके यांनी न्यायालयात जावून पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याबाबत याचिका दाखल केली. न्यायालयाने या फेरफार प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. त्यानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी भादवी कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. परंतु अटक मात्र कोणालाही केली नाही. आज सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त तलाठी दत्ता कदम यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.