निवृत्त फौजींनी साकारली शेवग्याच्या पाल्याची अनोखी शेती, पाल्याची पावडर कॅप्सूल आणि चहा

>> मिलींद देखणे

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात कमी पाणी, कमी खर्च आणि जास्त नफा देणाऱ्या शेवग्याच्या पाला शेती पारंपरिक पिकांना उत्तम पर्याय ठरत आहे. वाढता उत्पादन खर्च, सततची दुष्काळी परिस्थिती आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही शेती एक शाश्वत पर्याय ठरत असल्याचे या स्पष्ट झाले आहे.

निवृत्त सुभेदार दीपक अशोकराव खेडेकर आणि निवृत्त सुभेदार संतोष भानुदास नरवाडे यांनी तामिळनाडूतील कोईमतूर येथून आणलेली ‘वलय पट्टू’ ही सुधारित शेवग्याची जात शेवगाव तालुक्यात यशस्वीपणे लागवड करून दाखविली आहे. ही जात विशेषतः पाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, कमी पाण्यात जोमाने वाढणारी, जलद फुटवे देणारी आणि जास्त उत्पादन देणारी असल्याने दुष्काळी भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

शेती करताना त्यांनी पूर्णतः शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला. दोन ओळींमधील अंतर चार फूट आणि दोन झाडांमधील अंतर एक फूट ठेवण्यात आले. या अंतरामुळे प्रत्येक झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा व अन्नद्रव्ये मिळाली. परिणामी झाडांची वाढ चांगली झाली. रोगराईचे प्रमाण कमी राहिले आणि पाला उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.

पहिल्या तोडणीत एक क्विंटल 80 किलो शेवग्याचा पाला मिळाला, तर दुसऱ्या तोडणीत उत्पादन थेट दोन क्विंटल 30 किलोपर्यंत पोहोचले. योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर पाणीपुरवठा आणि नियमित तोडणी केल्यास वर्षातून 8 ते 10 तोडणी घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना एका वेळच्या पिकाऐवजी वर्षभर सातत्याने उत्पन्न मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

शेवग्याच्या पाला शेतीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये पाण्याची गरज अत्यल्प असते. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादनातही वाढ होते. रासायनिक खतांऐवजी शेणखत, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय घटकांचा वापर केल्याने उत्पादन खर्च कमी राहतो आणि पाला अधिक पौष्टिक व दर्जेदार मिळतो. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही शेती फायदेशीर ठरत आहे.

बाजारपेठेच्या दृष्टीनेही शेवग्याच्या पाल्याला मोठी मागणी आहे. ताजी भाजी म्हणून स्थानिक बाजारात चांगला दर मिळतोच, शिवाय आरोग्यविषयक जाणीव वाढल्याने शेवग्याच्या पाल्याची पावडर, कॅप्सूल, चहा आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांना देशांतर्गत तसेच परदेशी बाजारातही मागणी वाढत आहे. पाला सुकवून प्रक्रिया केल्यास साठवणूक आणि वाहतूक सुलभ होते, तसेच थेट शेतमाल विक्रीपेक्षा अधिक दर मिळण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे.

पारंपरिक पिकांना उत्तम पर्याय

कमी पाण्यात, कमी खर्चात आणि जास्त नफा देणारी शेवग्याची पाला शेती ही पारंपरिक पिकांना उत्तम पर्याय ठरत आहे. विशेषतः दुष्काळी परिस्थितीत शेती करणाऱ्या लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी तसेच पूरक उत्पन्नाच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही शेती आर्थिक स्थैर्य देणारी ठरू शकते, असे हे यशस्वी उदाहरण अधोरेखित करत आहे.