>> तरंग वैद्य
एक चांगली कथा, भव्यता, सौंदर्य, श्रीमंती, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, अभिनयाची संपन्नता हे सारं मांडत लाहोर शहरातील प्रसिद्ध तवायफखाना ‘हीरा मंडी’मधील जग, तिथल्या भावभावना दर्शवत इंग्रजांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याची जोडकथा दर्शवणारी ही मालिका अवश्य पाहण्याजोगी आहे.
हीरा मंडी… करमणूक विश्वात गेले काही महिने हे नाव खूप चर्चेत आहे. अंदाजे दोनशे कोटींचे बजेट असणारी आणि ‘हम दिल दे चुके सनम’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि अनेक भव्यदिव्य चित्रपटांचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सीरिज म्हणून सगळे आतुरतेने ‘हीरा मंडी’ची वाट बघत होते. इंतजार संपला, 1 मे 2024 पासून रुजू झालेली ‘हीरा मंडी – द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
स्वातंत्र्यापूर्वीचा हिंदुस्थान, देशातील लाहोर शहरातील प्रसिद्ध तवायफखाना किंवा ज्याला रेड लाइट एरियाही म्हटले जाते तिथली गोष्ट. या जागेला ‘हीरा मंडी’ हे नाव! त्या काळात श्रीमंत, नवाब आवर्जून मुजरा बघायला जायचे आणि तिथे भरपूर पैसे उधळायचे. त्यामुळे त्या काळातील कोठे म्हणजेच तवायफखाने भव्यदिव्य, त्यांची आंतरिक रचना-सज्जता उत्तम दर्जाची आणि तेथील स्त्रियांचे पोषाख, नट्टापट्टा खूप श्रीमंत असायचा. असे म्हटले जाते की, त्या काळातले धनिक त्यांच्या वयात येणाऱ्या मुलांना या कोठ्यांवर तहजीब म्हणजेच बोलण्या-वागण्यातील शिस्त शिकवण्यासाठी पाठवायचे. थोडक्यात, त्या काळात तवायफला मान होता, तसाच सर्वसामान्यांसाठी त्यांचा मोहल्ला बदनामही होता.
मंडी म्हणजे बाजार आणि बाजार म्हटला की, तिथे अनेक दुकाने आणि आपापसात स्पर्धा. हीरा मंडीमध्येही अनेक कोठे. त्यामुळे स्पर्धा ही आलीच आणि स्पर्धा म्हटली की द्वेष, मत्सर, कुरघोडीचे राजकारण…सर्वच आले. मालिकेची मूळ कथा याच स्पर्धेवर आधारित असून त्याला इंग्रजांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याची जोडकथा आहे. या दोन कथांची एकमेकांत गुंफण व्यवस्थित केली असल्यामुळे लय बिघडत नाही.
संजय लीला भन्साळी नाव घेताच, डोळ्यांसमोर येतात भव्य देखावे, विचारपूर्वक सजवलेली दृश्ये आणि उत्तम चित्रीकरण. इथेही त्यांनी त्यांचे नाव राखले आहे. सेट्स भव्य आहेत, सुंदर सजवले आहेत. सर्वच कलाकारांच्या पोशाखांवर घेतलेली मेहनत दिसून येते. साध्या काचेच्या तुकड्याला हिऱ्याचे स्वरूप देऊन प्रेक्षकांसमोर आणण्यात भन्साळींचा हातखंडा आहे. तो त्यांनी या मालिकेतही कायम ठेवला आहे. एकूण भव्यता बघून हीरा मंडी मालिका सिनेमा स्वरूपात असती तर मोठ्या पडद्यावर डोळे भरून बघता आली असती ही खंत मालिका बघताना जाणवते.
अभिनयाबद्दल बोलायचे तर मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरीसारख्या नावाजलेल्या कलाकारांनी या मालिकेची अभिनयाची बाजू उत्तम सांभाळली आहे. शेखर सुमन, फरदीन खान आणि इतर कलाकारही आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहेत. फरिदा जलाल यांना बरेच दिवसांनी बघताना छान वाटले. मुख्य कथानक फरिदन म्हणजे सोनाक्षी आणि मलिका जान अर्थात मनीषा कोईरालाच्या अवतीभोवती फिरतं. दोघींची जुगलबंदी बघताना छान वाटते.
या मालिकेची चर्चा आणि जाहिरात खूप झाली. सर्वसामान्यांसाठी रेड लाइट एरिया हा कुतूहलाचा विषय. कारण कोणीही सहजासहजी तिकडे जाऊ शकत नाही. का? कारण त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि शंकाकुशंका असतात, समाज काय म्हणेल ही भीती असते. आपल्या मनात असलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं असले विषय घेऊन तयार केलेल्या सिनेमा, मालिकांमधून मिळतात. इथे तर 1940चा काळ, जो तवायफ किंवा कोठय़ांचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यामुळे या वेब सीरिजला चांगला प्रेक्षक वर्ग लाभला आहे. परदेशातसुद्धा ही मालिका प्रेक्षक आवर्जून बघत आहेत.
आठ भाग असणाऱ्या या मालिकेचा एकूण कालावधी जवळपास आठ तासांचा आहे. काहींना एपिसोडची लांबी खटकत आहे, तर काहींना एपिसोडची गती. पण एक चांगली कथा, भव्यता, श्रीमंती, स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, अभिनयाची संपन्नता बघायची असेल तर या खटकणाऱ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. त्यामुळे या बाबींकडे दुर्लक्ष करत ‘हीरा मंडी – द डायमंड बाजार’ ही मालिका अवश्य बघा.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)