बाटला हाऊस : एका देशाभिमानी शूराची गाथा

2821

१५ ऑगस्टला आधीच आपल्या मनात देशप्रेमाची ज्योत उजळलेली असते. त्यात जर देशाबद्दलची कुठचीही शौर्य गाथा संपर्कात आली की ऊर भरून येतोच. अशावेळी प्रर्दिशत झालेले देशप्रेमी सिनेमे म्हणजे पर्वणीच. आणि याचा नेमका विचार करत प्रर्दिशत झालेला ‘बाटला हाऊस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनातल्या देशप्रेमाला नक्कीच सुखावतो.खरी घडलेली गोष्ट, त्याच्यावर सच्चा देशप्रेमाचं असणारं आवरण आणि त्यातच बॉलीवूड स्टाईलची लज्जत असणारा सिनेमा प्रेक्षकांना भारावून सोडण्यात यशस्वी ठरतो.

बाटला हाऊस पूर्णपणे एका घडलेल्या घटनेवर आधारित आहे. दिल्लीतल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दिल्लीतल्या पोलिसांवर गुन्हेगारांना कधी पकडणार, असं वजन ठेवण्यात आलं आणि आपण सक्षमपणे काहीतरी कार्य केलंय हे दाखवण्यासाठी त्यांनी बाटला हाऊस ही जागा हेरून खोटा एन्काऊंटर केला आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निरागस मुलाचा बळी घेतला असा आरोप झाला. पोलिसांबद्दल प्रचंड राग सगळीकडे पसरला होता. पण हा खरंच खोटा एन्काऊंटर होता की ते खरोखरचे दहशतवादी होते, त्याचं पुढे काय झालं, पोलीस आणि गुन्हेगार यातली सीमारेषा कशी ठरली, नेमकं बाटला हाऊस का निवडण्यात आलं, पोलिसांवर लागलेला आळ नक्की कितपत गंभीर होता आणि खोटे एन्काऊंटर नक्की होतात का, अशा अनेक गोष्टी उलगडणारा आणि काळाच्या ओघात पुसट झालेल्या एका शूराची गाथा मांडणारा हा सिनेमा.

मुळात हा सिनेमा घडलेल्या घटनेवर आहे. पण ती घडलेली घटना पडद्यावर मांडताना दिग्दर्शकांनी अर्थातच सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे आणि त्यासोबत सत्याला भरपूर नाट्याची जोड दिली आहे. असं अर्थात अनेक सिनेमांमध्ये केलं गेलं असलं तरीही जेव्हा विषय गंभीर असतो तेव्हा एका क्षणानंतर प्रेक्षकाला नेमकं काय झालं हे जाणून घेण्यात रस असतो आणि जेव्हा दिग्दर्शक निखिल अडवाणी असतो तेव्हा अपेक्षा नक्कीच जास्त होतात. हा सिनेमा खिळवून ठेवणारा असला तरी नाट्य रंजकता आणि सत्य यात थोडी जास्त सरमिसळ झाल्यासारखी वाटते.

सुरुवातीला पडद्यावर लगेच घटना दिसते. जास्त घोळत न बसता दिग्दर्शकाने आधीच थेट घटनेत हात घातला आहे आणि नंतर त्याचं विश्लेषण उलगडले आहे. सिनेमाची ही पद्धत नक्कीच छान आणि वेगळी आहे. प्रेक्षकाला उगाच वेठीस न धरता तरीही उत्कंठा कायम राखत हा सिनेमा उलगडतो. पण नंतर हीरोचे सांसारिक प्रश्न, विस्कळित झालेलं लग्न, बायको पत्रकार आणि त्यामुळे घडणारं नाट्य हे जरा जास्त ताणल्यासारखं वाटतं.

दहशतवाद्यांशी लढा देणारा शूर पोलीस जरी हीरो असला तरीही गोळीबारात त्याचीही मानसिकता अस्थिर होऊ शकते. त्यालादेखील आपल्या सहकाऱ्याला डोळ्यासमोर मरताना पाहून हलून जायला होतं हे सगळं दाखवायचा दिग्दर्शकाने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पण त्याचवेळी कोर्ट नाट्य थोडं अतिरंजित वाटतं. हीरोचं शेवटचं संभाषण नसतं तर कदाचित या सिनेमाचा प्रभाव खूप खरा आणि जास्त पडला असता असं देखील वाटतं. पण तरीही एकुण सिनेमा पाहताना प्रेक्षक भारावतो हेदेखील तितकच खरं.

जॉन अब्राहम या अभिनेत्याला पोलिसी खाक्यात पाहायला नक्कीच छान वाटतं. त्याचा रुबाब आणि एकुणच सगळं त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतं. या सिनेमातही हा अनुभव पुन्हा एकदा येतो. म्हणून हा सिनेमा जॉनच्या चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल. त्याने चांगलं काम केलंय. मृणाल ठाकूर ही अभिनेत्री पण लक्षात राहते. तिच्या वाट्याला जे आलंय ते तिने मनापासून केलंय. रवी किशन छोट्या भूमिकेत असूनही छाप पाडतो. राजेश शर्मा वगैरे पण छोट्या भूमिकेत बरे आहेत. या सगळ्यांच्या वाट्याला फार काही नसलं तरी नेमकं काम आहे.

सिनेमा पटकथेत आणखी घट्ट बनवता आला असता आणि काही ठिकाणचा फाफटपसारा टाळता आला असता, अधिक चांगलं झालं असतं. पण एकूण बाटला हाऊस एका मोठ्या घटनेवर प्रकाश टाकायचा प्रयत्न करत प्रेक्षकांना रंगतदार सिनेमाचा हवाहवा असा अनुभवदेखील देतो हे मात्र नक्की.

सिनेमा – बाटला हाऊस
दर्जा – तीन स्टार
निर्माता – भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, किशन कुमार
दिग्दर्शक – निखिल अडवाणी
लेखक – रितेश शाह
कलाकार – जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, रवी किशन, मनीष चौधरी, राजेश शर्मा

आपली प्रतिक्रिया द्या