प्रवास कापसाचा…

209

>> माधव डोळे

कापूस आणि माणूस यांचे नाते अतिशय जिव्हाळय़ाचे आणि घट्ट आहे. एवढेच नव्हे तर समस्त मानवजातीच्या आयुष्याचा कापूस हा अविभाज्य घटक मानला जातो. कापसापासून सूत आणि सुतापासून कापड एवढेच आपल्याला माहीत आहे, पण त्या अलीकडे आणि पलीकडे असलेल्या प्रक्रिया, विविध प्रकारच्या घडामोडी, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, शेतकऱ्याच्या आत्महत्या, पाऊस, कापसावर पडणारा रोग अशा अनेक घटना कापसाभोवतीच गेली अनेक वर्षे फिरत आहेत. कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी ‘एक धागा सुखाचा… शंभर धागे दुःखाचे’ अशा शब्दांत माणसाच्या जीवनाचे वर्णन केले, पण सर्वसामान्य शेतकरी या कापूस फेऱ्यात अडकल्याने त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले आहे. या कापसाचा सांगोपांग आणि संशोधनात्मक आढावा घेण्याचे महत्त्वपूर्ण काम लेखक राजीव जोशी यांनी ‘कापूस… सरकीपासून सुतापर्यंत’ या पुस्तकात केले आहे. लेखकाचे मूळ गाव हे जळगाव. घरी कापसाची शेती. त्यामुळे कापसाचे नाते लहानपणापासूनच जोडले होते. पुढे याच कापसाचा त्यांच्या नोकरीतही संबंध आला. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 41 वर्षे काम केल्याने कापसाचा प्रादेशिक स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा कारभार कसा चालतो याचा जवळून अभ्यास त्यांनी केला आहे. या कापसाशी त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या विदर्भात होतात आणि विदर्भातच मोठय़ा प्रमाणावर कापूस पिकवला जातो ही बाब लेखकाच्या कविमनाला अनेक वर्षांपासून बोचत होती.

या आत्महत्येचे मूळ शोधत असतानाच राजीव जोशी यांना आपला अनुभव कामी आला. देशाच्या विविध भागांतील कापसाच्या पिकांचा त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू येथील कापसाची अवस्था काय आहे याचेही निरीक्षण केले आणि त्यातून साकारले ‘कापूस’ हे पुस्तक. इंग्रजीमध्ये कापसावर काही पुस्तके आहेत, पण मराठीत कापसाचा सखोल अभ्यास करून लिहिलेले हे पहिलेच पुस्तक असावे. एकूण 25 प्रकरणांमध्ये लेखकाने कापूस व्यवहाराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. कापसाची कूळकथा, कापसाचे अंतरंग, कापूस तंत्रज्ञान विकास प्रकल्प, राज्यनिहाय कापूस उत्पादन, कापूस वेचणी, महाराष्ट्रातील वाटचाल, कापसाचा विश्वपट, बाल कामगार व महिला, हिंदुस्थानातील कॉटनॉमी ही प्रकरणे केवळ वाचनीय नव्हे तर अभ्यासपूर्ण ठरली आहेत.

अर्बेरियम, हर्बोसियम, हिर्सुटम आणि बार्बाडेन्स या कापसाच्या चार जाती मानल्या जातात. या प्रत्येक जातीची माहिती लेखकाने दिली आहे. कापसावर मर, कोनाकार टिक्कार, मळकूज, कवडी, कोरडी कूज, दहिया, पर्णगुच्छ, बोंडअळ्य़ा असे विविध प्रकारचे रोग पडतात. त्यांचीदेखील सखोल माहिती दिली असून त्यावर उपाययोजनाही सुचवलेली आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे या विभागात कापसाचे मोठय़ा प्रमाणावर पीक घेतले जाते. प्रत्येक ठिकाणची जमीन व पावसाची परिस्थिती वेगळी आहे. त्याचा बारीक तपशील या पुस्तकात दिला असून महाराष्ट्रातील जमीन कापूस पिकासाठी सकस असतानाही त्यात येणाऱया अडचणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यामागील अर्थकारण, सरकारी धोरण, राजकारण असे अनेक विषय लेखकाने समर्थपणे हाताळले आहेत.

बीटी कापसाचे उत्पादन हे गेल्या काही वर्षांत चर्चेचा विषय बनले आहे. महाराष्ट्र हायब्रिड सीडस् कंपनीने बीटी तंत्रज्ञान पहिल्यांदाच हिंदुस्थानात आणले. या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे सविस्तरपणे पुस्तकात मांडले आहेत. विशेष म्हणजे कापूस उत्पादनासंदर्भातील रंगीत छायाचित्रांमुळे हे पुस्तक अधिक भरजरी झाले आहे. कापसाचा धागा या विषयावरही महत्त्वपूर्ण माहिती दिली असून हरयाणा, राजस्थान, पंजाब या राज्यांमध्ये कापसाची नेमकी काय परिस्थिती आहे याचीदेखील माहिती वाचकांना मिळते. कापसाच्या तांत्रिक बाबींपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंतचा आढावा लालित्यपूर्णरीत्या घेतल्याने आकडेवारी, नकाशे असूनही पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे. कापूस उत्पादक शेतकरी, पत्रकार, अभ्यासक, राजकारणी मंडळी, सरकारी अधिकारी यांच्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. हळुवारपणे कविता लिहिणारा कवी तेवढय़ाच सखोलपणे कापसासारख्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करू शकतो याचे हे उदाहरण आहे. महाराष्ट्र व देशातील कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याकरितादेखील ‘कापूस’ हे पुस्तक दिशा दाखवील यात शंका नाही. शेतात राबणाऱ्या महिलेची वेदना कवी बा. सी. मर्ढेकर यांनी ‘बोंड कपाशीचे फुटे’ या कवितेत मांडली आहे. कापूस या पुस्तकामुळे ही वेदना थोडीफार जरी कमी झाली तरी लेखकाच्या मेहनतीचे चीज झाले असे म्हणावे लागेल.

कापूस…सरकीपासून सुतापर्यंत
लेखक – राजीव जोशी
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पृष्ठ – 167 मूल्य – रु. 250/-

आपली प्रतिक्रिया द्या