वास्तवतेला कथेचा साज

>> अस्मिता प्रदीप येंडे

2020 हे वर्ष आपणा सर्वांच्या कायम लक्षात राहणार आहे त्याचे कारण म्हणजे ‘कोरोना व्हायरस’. सगळं कसं सुरळीत सुरू असताना अचानक कोरोना आपल्याकडे येऊन धडकला आणि सगळं चित्रच बदललं. संपूर्ण जग लॉकडाऊन झाले. सगळे बंद. कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, रेल्वे, गाडय़ा सगळं बंद. सुरू होती ती फक्त रुग्णालये. कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली. तोंडावर मास्क आले, सॅनिटायझर सोबती झाला. सोशल डिस्टन्सिंग आले. भीतीपोटी का होईना, सगळे आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे कुणी नकारात्मकतेने पाहत होते, तर पुणी सकारात्मकतेने. या परिस्थितीतून मार्ग काढून पुढे जाण्याची प्रेरणा देणारे बरेच उपक्रम या कालावधीत राबविले गेले. कोरोनामुळे आलेल्या परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीने विचार करून त्या अनुभवांवर एक सुंदर कथासंग्रह लेखक सुनील पांडे यांनी लिहिला आहे. तो कथासंग्रह अर्थात ‘लॉकडाऊनच्या कथा’. स्नेहवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ‘लॉकडाऊनच्या कथा’ म्हणजे प्रत्येकाचे अनुभव आहेत. आपण सगळेच यातून गेलो आहोत. अनेक नवीन शब्द आपल्या शब्दकोशात समाविष्ट झाले. अनेक बदल आपण स्वीकारले. लेखक सुनील पांडे यांनी याच लॉकडाऊनच्या अनुभवांतून अनेक कथा आपल्या लेखणीतून साकारल्या. कोरोना काळातील कोणतेही प्रसंग असो, घरातील छोटे छोटे प्रसंग, गृहिणीचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, महागाई, वाढती रुग्णसंख्या, कार्यक्रमांवरची बंदी, दुकानांच्या मर्यादित वेळा, शाळा, गाडय़ा, लग्नसोहळे, ऑनलाइन शिक्षण, आणखी बरेच विषय घेऊन लेखक सुनील पांडे यांनी सुंदर कथा लिहिल्या आहेत. कथासंग्रहात एकूण 75 कथांचा समावेश आहे.

‘लॉकडाऊनच्या कथा’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा साध्या, सरळ आणि नेमक्या शब्दांत मांडलेल्या आहेत. त्यामुळे पुठेही अतिशयोक्ती भासत नाही. प्रत्येक कथेला वास्तवतेचे पदर आहेत. काही कथा विनोदी पद्धतीने लेखकाने लिहिल्या आहेत तर काही संवेदनशील भावनेने सत्याची जाणीव करून देणाऱया आहेत. कोरोनामुळे आलेले अनुभव हे काहीसाठी आनंददायी होते, पण काहीसाठी अत्यंत वेदनादायी होते. कित्येकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. या सगळ्या भावना मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

कोरोनामुळे झालेल्या बदलांचा स्वीकार करून या सर्व गोष्टींकडे सकारात्मक नजरेने पाहत लेखक सुनील पांडे यांनी या पुस्तकाचे लेखन करून साहित्यात नवीन भर टाकली आहे. शेवटी दृष्टिकोन महत्त्वाचा. कथासंग्रहातील प्रत्येक कथेतून लेखकाने काहीना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. लेखकाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि एखाद्या गोष्टीला कथारूप देण्याची कला या पुस्तकातून दिसून येते.

‘लॉकडाऊनच्या कथा’ कथासंग्रहाचे मुखपृष्ठ संतोष धोंगडे यांनी अगदी समर्पक रेखाटले आहे. स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिटय़ूट, पुणेच्या अध्यक्षा डॉ. स्नेहल तावरे यांनी मलपृष्ठावर अगदी यथायोग्य पाठराखण लिहिली आहे. लॉकडाऊन आपण सगळ्यांनी अनुभवला आहे, पण तेच अनुभव कथांच्या स्वरूपात, लेखकाच्या खुमासदार शैलीत एक वेगळाच अनुभव देऊन जातील!
लॉकडाऊनच्या कथा
लेखक ः सुनील पांडे
प्रकाशक ः स्नेहवर्धन प्रकाशन
पिंमत ः 250 रुपये.

आपली प्रतिक्रिया द्या