दखल – छोट्यांसाठी गिर्यारोहण

>> अरुण मालेगावकर

मेश झिरपे हे नाव गिर्यारोहणाच्या विश्वात सर्वश्रुत आहे. चौदा सर्वोच्च शिखरांपैकी सात शिखरे सर करण्यात त्यांनी जागतिक कीर्ती मिळविली आहे. सुमारे चाळीस वर्षे त्यांनी हा छंद यशस्वीरीतीने जोपासला असून ‘गोष्ट एक ध्यासाची – एव्हरेस्ट’ हे त्यांचे पुस्तक उत्तम मार्गदर्शक म्हणून मान्यता पावले आहे. ‘गार्डियन गिरीप्रेमी’ ही संस्था म्हणजे दक्षिणेतील गिर्यारोहणाची पहिली आणि एकमेव प्रशिक्षण संस्था आहे. अशा अधिकारी माणसाने आपले अनुभव मुद्दाम किशोरांसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून लिहिले आहेत.

गिर्यारोहण म्हणजे काय, त्यासाठी योग्य वय कोणते, त्याची तयारी कशी करावी, त्याचे फायदे कोणते आणि ते कुठे कुठे करावे, या प्रश्नांची त्यांनी सारांशात उत्तरे दिली आहेत. गिर्यारोहणाचे विविध प्रकार वाचल्यावर लक्षात येते की, कोणताही खेळ हा माणसाला तना-मनाने सबल करतो, तसाच खिलाडूवृत्तीसुद्धा शिकवतो. वयाच्या दहाव्या वर्षांपासून या छंदाची जोपासना केल्यास ऐन तारुण्यात गिर्यारोहक ही कला लवकर शिकू शकतो. त्यास आवश्यक साहित्याची माहिती मिळते.

मुळातच विद्यार्थीदशेत स्वभाव धाडसी बनण्यास फार मदत होते. समूहात मिसळण्याची सवय लागल्याने निरीक्षणशक्ती वाढते. शिवाय व्यक्तिमत्त्व आकर्षक, उत्साही होते. पर्यावरणाशी अतूट नाते निर्माण होते.

असे प्रशिक्षण देणाऱया संस्था कुठे आणि कोणत्या आहेत, ही उपयुक्त माहिती आहे. ती वाचून इच्छुकांना संपर्क साधणे सहजशक्य आहे.

मुलांसाठी गिर्यारोहण/छंद
लेखक – उमेश झिरपे
प्रकाशक – रोहन प्रकाशन, पुणे – 20
पृष्ठ – 44, मूल्य – रुपये 75/-

आपली प्रतिक्रिया द्या