Cinderella : तरुणाईची समृद्ध प्रायोगिकता

69


>> क्षितिज झारापकर

आजची तरुणाई प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग करतेय. हे चित्रच खूप सुखावणारे आणि आशादायी आहे.

मराठी रंगभूमीला प्रायोगिक चळवळीचा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे. हिंदुस्थानातली इतर प्रांतीय नाटय़क्षेत्रे ही एकतर फक्त प्रायोगिक आहेत किंवा केवळ व्यावसायिक आहेत. प्रायोगिक अणि व्यावसायिकचा सुदृढ मेळ थोडा कर्नाटकातल्या कन्नड रंगभूमीवर अणि खूप चांगल्या पद्धतीने मराठी रंगभूमीवर आढळतो. परवाच झालेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारोहात जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आणि ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी पुन्हा एकदा स्व. दामू केंकरे यांनी बारा वर्षांपूर्वी परिषदेकडे केलेली  मागणी समोर आणली. मराठी प्रायोगिक रंगभूमीसाठी स्वतंत्र रंगमंच देण्याची ती मागणी होती. प्रायोगिक रंगभूमीचा स्वर्णकाळ म्हणजे गेल्या शतकातील सत्तरीचं दशक. तेव्हा दादरच्या भरबाजारात छबिलदास मुलांच्या शाळेत दुसर्‍या मजल्यावरचा एक मोठा वर्ग प्रायोगिक मराठी नाटकांकरिता हक्काने उपलब्ध असायचा. ‘जुलूस’, ‘मुखवटे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’सारखी दर्जेदार प्रायोगिक नाटकं मी शाळकरी वयाचा असताना तिथे पाहिलेली आठवतात. हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे नाडकर्ण्यांनी केलेली मागणी आणि आजच्या नव्या दमाच्या प्रायोगिक रंगकर्मींची अस्तित्वासाठी सुरू असलेली ससेहोलपट. त्यातून त्यापैकी एका समूहाने सादर केलेलं एक प्रायोगिक नाटक ‘सिंड्रेला.’

‘सिंड्रेला’चा जनक सिध्दार्थ साळवी. हा तरुण रंगकर्मी नेटाने प्रायोगिक रंगभूमीवर गेली काही वर्षे कार्यरत आहे. ‘सिंड्रेला’या त्याच्या आताच्या नाटकाकडे वळण्याआधी आपण जरा प्रायोगिक रंगभूमीच्या आजच्या सत्यतेकडे पाहूया. छबिलदासचं हक्काचं व्यासपीठ नव्वदच्या दशकापर्यंत लुप्त झालं होतं. प्रायोगिक नाटकात रमणार्‍या दिग्गज संस्था संपल्या होत्या. एक आविष्कार संस्था केवळ अविरत सुरू होती. ती आजतागायत जोमाने चालू आहे. या सगळ्यात मराठी प्रायोगिक रंगभूमी ही रंगमंच शोधत फिरू लागली. एकेकाळी दिमाखात उभा राहणारा मराठी रंगभूमीचा हा पैलू आता विविध स्पर्धांमधून हंगामी स्वरूप घेऊन जगू लागला. अभिजीत झुंझारराव, विपुल महागावकर, सिध्दार्थ साळवी ही मंडळी आज या स्पर्धांवर आपली भिस्त ठेवून आहेत. रवींद्र नाटय़ मंदिरचं मिनी थिएटर आणि साठे कॉलेजचं सभागृह गेल्या काही वर्षांत उपलब्ध झाली आहेत. तिथे प्रायोगिक प्रयोग होतात. ‘सिंड्रेला’चा प्रयोग यशवंत नाटय़ मंदिरात झाला जो पाहता आला.

‘सिंड्रेला’ हे सिद्धार्थ साळवीचं नाटक म्हणजे लहान मुलांची सिंड्रेलाची गोष्ट नव्हे. सिद्धार्थच्या या नाटकातली सिंड्रेला आजची सज्ञान मुलगी आहे, पण तिची मनाजोगता राजकुमार मिळण्याची मनीषा आजही तशीच आहे. आजचा राजकुमार मात्र परिकथेतल्या राजकुमारासारखा सृजनशील नाही. आजची सिंड्रेलाही स्वतःच्याच घरात दासीप्रमाणे राहणारी निरागस सावत्र मुलगी नाही. असा कथेचा घाट घालून सिद्धार्थ आपल्यासमोर सिंड्रेला उभी करतो. लिखाणात ‘सिंड्रेला’ आजच्या मानसिकतेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर दृष्टिक्षेप टाकत पुढे सरकतं. आयुष्यात जगताना माणसांना काय काय हवं असतं आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येक जण सिंड्रेला बनतो किंवा बनते असा काहीसा विचार या नाटकात मांडलेला आहे. ‘सिंड्रेला’मध्ये तीन परिस्थितींची तीन स्वतंत्र, पण एका प्लेनवर समान असणारी कथानकं एकाच वेळी चालतात. त्यातलं एक परिकथेतील सिंड्रेलाचं कथानक. बाकीची दोन आजच्या युगातील, दोन सिंड्रेलाच्या कहाण्या एकाच वेळी या तीन गोष्टी दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न स्तुत्य आहे आणि यशस्वीही झालेला आहे. तिन्ही सिंड्रेला लेखक-दिग्दर्शकाला जे सांगायचंय ते सांगायला ताकदीने उभ्या राहतात.

शोषित मानसिकतेची मुग्धा, उद्विग्न अवस्थेतली सीमा आणि सिंड्रेला  या तिन्ही व्यक्तिरेखा अक्षता आचार्य, पूजा साळवी आणि विजया बाबर यांनी उत्तम साकारल्या आहेत. अक्षय गोळे, विनीत तांडेल अणि आकाश चंदीवाल यांनी त्यांना योग्य साथ दिली आहे. तन्वी शेवाळे, अदिती गौरकर यांचं इंग्रजी भाषेच्या डिक्शनरीवरची विशेष मेहनत कौतुकास्पद आहे. कुणाल-करण या जोडीने संगीतात विविधता बाळगून उत्तम कामगिरी केलेली आहे. अमोघ फडके हा प्रकाश योजनाकार खूप आशादायी आहे. नाटकाची दृष्यात्मकता वाढवून अधोरेखित करण्याची कुठलीही संधी अमोघ सोडत नाही.

‘सिंड्रेला’ हा एक चांगला प्रायोगिक प्रयोग आहे. रंगकर्मींना खूप काही सुचत असतं. ते प्रत्यक्ष साकारून पाहणं अत्यावश्यक असतं. सिंड्रेला हा अशातला प्रकार आहे. सिध्दार्थ साळवी हा रंगकर्मी आपल्या नाटकांना दृष्यात्मक विचार करतो. नव्या पिढीच्या रंगकमांमध्ये ही गोष्ट सातत्याने आढळते. आणखी एक प्रायोगिक रंगकर्मी अभिजीत झुंझारराव सिनेमॅटिक प्रेझेन्टेशन करतो. या प्रयोगांना आता छबिलदास पुरं पडणार नाही. ऍग्रो थिएटर, घराच्या दारी नाटक, प्रदीप  वैद्य यांचं पेक्षकांनाही रंगमंचावर बसवून केलेलं काजव्यांचं गाव हे आज प्रायोगिक क्षेत्र आहे. अशा प्रयोगांमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेल्या हक्काच्या प्रायोगिक व्यासपीठाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होतो. व्यावसायिक मराठी नाटक इंडस्ट्रीचं  आर ऍण्ड डी डिपार्टमेंट म्हणजे प्रायोगिक चळवळ आहे.  हे ओळखून हे काम व्हायला हवं. प्रयोगशाळेचा दर्जा जितका चांगला तितकं सरस अणि सकस प्रॉडक्ट तयार होणार ही निकडीची गरज मानून नाटय़ परिषदेने यावर लक्ष केंद्रित करायला हवं. सरकार अणि नाटय़ परिषद इथे लक्ष देतील ही सदिच्छा !

नाटक : Cinderella 

निर्मिती : ड्रीम थिएटर्स मुंबई, रंगनील

गीत आणि संगीत : कुणाल-करण

नेपथ्य : सुमेध साळवी

प्रकाश : अमोघ फडके

वेशभूषा : ऋतुजा

रंगभूषा : अफ्शा खान

लेखक, दिग्दर्शक : सिद्धार्थ साळवी

कलाकार : आकाश चांदीवाल, ऋषिकेश थोरवे, अक्षय गोळे, विनित तांडेल, सोनाक्षी सिंह,

अक्षता आचार्य, अदिती गौरकर, तन्वी शेवाळे, विजया बाबर

दर्जा : ***

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या