पानिपत – मराठ्यांच्या पराक्रमाची दिपवणारी गाथा

2114

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

इतिहास अभ्यासताना पानिपतच्या लढाईचा उल्लेख कधीच टाळता येत नाही किंबहुना एखाद्या गोष्टीत नामुष्की आली की आपण अगदी सहज बोलून जातो की, त्याचं अगदी पानिपत झालं. पण पानिपत झालं म्हणजे नेमकं काय झालं, ते कथन करणारा आणि त्यासोबत मराठ्यांच्या शौर्यगाथेने पुन्हा एकदा आपल्याला खिळवून ठेवणारा सिनेमा म्हणून ‘पानिपत’ नक्कीच ठसा निर्माण करतो.

अफगाणिस्तानमधून क्रूर अहमदशहा अब्दाली हिंदुस्थानात आला ते हिंदुस्थानवर साम्राज्य करायचा मनसुबा घेऊनच. पण सदाशिवराव पेशव्यांनी आपल्या सैन्यासह थेट पानिपतपर्यंत येऊन त्या भल्यामोठ्या सैन्याशी जिद्दीने आणि शौर्याने लढत दिली. ही रणधुमाळी प्रचंड पेटली. अर्थात त्यात मराठ्यांचा पुरता पाडाव झाला. प्रचंड जीवितहानी झाली, भयानक नुकसान झालं, पण या युद्धाने मराठी शौर्याच्या नव्या परिसीमा अनुभवल्या. इतकंच नाही तर मराठ्यांचा पराभव झाला असला तरीही अब्दालीने यानंतर पुन्हा हिंदुस्थानवर कधीच आक्रमण केलं नाही. त्याच युद्धाची गाथा या सिनेमातून उलगडते.

या सिनेमाने कालखंड अप्रतिम उभा केलाय. प्रचंड मोठ्या युद्धाची घनघोरता पडद्यावर पाहताना डोळे अक्षरशः दिपून जातात आणि पेशव्यांचा पराक्रम पाहताना पराभव पदरी पडला असला तरीही ऊर अभिमानाने भरून येतो. एकूणच आशुतोष गोवारीकरचा हा सिनेमा पाहिल्यावर पानिपतची वेगळी व्याख्या मनात नव्याने रुजते.

या सिनेमाचा कणा आहे आशुतोष गोवारीकर यांनी केलेलं दिग्दर्शन. ऐतिहासिक बाजाला कुठेही इजा होऊ न देता सिनेमाचं करमणूक मूल्य जपून त्यांनी अत्यंत शिताफीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. खरं तर ते खूप कठीण होतं. पराभवाची गाथा मांडायची आणि तीदेखील प्रेक्षकांच्या मनात ती गोष्ट नव्याने उलगडायची हे सगळं खूप बारकावे जपून करणं आवश्यक होतं, पण गोवारीकर यांनी ते अगदी लीलया पार पाडलं आहे. कुठेही अतिरंजितपणा वाटणार नाही, पण तरीही एवढय़ा मोठ्या लढाईचं जाज्वल्य तसूभरही कमी होणार नाही या गोष्टीचं अगदी उत्तम भान ठेवलं आहे.

सिनेमाचं लिखाण, संकलन, छायांकन या सगळय़ाच गोष्टी सिनेमाला पूरक आहेत. सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन कपूरला उत्तम ब्रेक मिळालाय आणि या संधीचं त्याने सोनं केलंय. शौर्य, धडाडी आणि हिंमत या सगळय़ा गोष्टी इतक्या जिवंत उभ्या केल्या आहेत की, शेवटच्या दृश्यापर्यंत आपण खिळून राहतो. क्रिती सॅनन पार्वतीबाई म्हणून छान दिसते. जरी तिची भूमिका बॉलीवूडला साजेशी आणि थोडी रंगतदार असली तरीही तिने ती चांगली साकारली आहे. संजय दत्त तर कमालच. त्याच्या पहिल्या दृश्यापासून ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत तो प्रेक्षकाला बांधून ठेवतो. खरं तर सगळय़ांचीच कामं छान झाली आहेत आणि त्यामुळे एकूण सिनेमा जमून आलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. सिनेमाची लांबी जरा जास्ती आहे, पण मध्यांतरानंतर सिनेमा जी पकड घेतो ती बघता वेळेचा विसर पडतो हे खासच.

इतिहासाची फारशी माहिती नसणाऱ्यांना कदाचित पानिपत झालं म्हणजे मराठे पळपुटे होते किंवा खूप वाईट पराभव घेऊन खचले असं वाटत असेल तर त्यांनी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. मराठी शौर्य आणि जिद्दीचा कदाचित नीट ठाऊक नसलेला विलक्षण अनुभव हा सिनेमा नक्कीच देईल.

सिनेमा पानिपत

दर्जा    ****

निर्माता सुनीता गोवारीकर, रोहित शेलकटकर.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर

लेखक    चंद्रशेखर ढवळीकर, रणजित बहादूर,आदित्य रावल, आशुतोष गोवारीकर.

संवाद    अशोक चक्रधर

संगीत    अजय अतुल

छायांकन     सी. के. मुरलीधरन

कलाकार     अर्जुन कपूर, क्रिती सॅनन, संजय दत्त, मोहनीश बेहेल, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, रवींद्र महाजनी, गश्मीर महाजनी, सुहासिनी मुळ्ये, दुष्यंत वाघ.

आपली प्रतिक्रिया द्या