
>> पराग खोत
सध्या रंगभूमीवर पुनरुज्जीवित नाटकांचा जोर पुन्हा जाणवतो आहे. पूर्वी प्रचंड यश मिळवलेल्या अनेक जुन्या नाटकांच्या नव्या आवृत्ती आज पुन्हा रंगमंचावर येत असून, निर्मात्यांना आर्थिकदृष्टय़ाही हातभार लावत आहेत. सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ संस्थेने काही वर्षांपूर्वी सादर केलेल्या मर्यादित प्रयोगांच्या संकल्पनेला नाटय़रसिकांनी अलोट प्रेम आणि भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतरही अशा स्वरूपाचे अनेक प्रयोग रंगभूमीवर झाले. सध्या पुनरागमन केलेले प्रा. मधुकर तोरडमल लिखित आणि गाजलेले महोत्सवी नाटक ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे त्याच परंपरेतील पुढील पाऊल म्हणावे लागेल.
‘बंडा आणि प्यारे’ हे कॉलेजचे ‘आद्य विद्यार्थी’ असल्याचा अभिमान मिरवणारे दोन टगे आपल्या हॉस्टेलच्या खोलीत त्यांच्या नव्या रूम पार्टनर्सची वाट पाहतायत. सीनियर असल्याचा माज, खोलीवरची मत्तेदारी आणि येणाऱया नवख्यांवर रॅगिंग करून आपली कामे करून घेण्याची योजना असा त्यांचा डाव आहे. मात्र मुकुंद भागवत ऊर्फ पुंदा आणि दीनानाथ दामोदर थत्ते ऊर्फ डीडीटी हे दोन पूर्णपणे परस्परविरोधी स्वभावाचे अफलातून नमुने त्यांच्या आयुष्यात येतात आणि गोंधळाला सुरुवात होते. या चौघांच्या उचापती, गैरसमज आणि गंमती यांचे मनोरंजक पॅकेज म्हणजे हे नाटक. या सगळ्यांना जोड मिळते ती प्रा. बारटक्के आणि दीनानाथ थत्ते यांची पूर्वाश्रमीची प्रेयसी असलेल्या प्राध्यापिका पार्वती देशपांडे यांची. सोबत कॉलेज क्वीन ढमी आणि तिचे वडील ही पात्रेही या धमाल वातावरणात रंग भरतात.
महाविद्यालयीन वातावरणात घडणारे हे विनोदी नाटक तिथली भाषा, तिथली गंमत आणि पात्रांमधील परस्परसंबंध यांवर नेमके भाष्य करते. प्रा. बारटक्के हे मध्यवर्ती पात्र विनोदनिर्मितीसाठी उभे केले असले तरी एकाकी विधुराच्या मनातील व्यथा आणि तगमगही सूचक पद्धतीने व्यक्त होते. त्यांच्या तोंडी असलेली ‘ह’ची बाराखडी – ‘हा, ही, हे’ – सतत हास्यनिर्मिती करते. महाविद्यालयीन प्रेमप्रकरणे, समज-गैरसमज, तसेच तरुण पिढी आणि प्रौढांमधील नातेसंबंध या सगळ्या टप्प्यांतून जात नाटक अखेरीस प्रेक्षकाच्या मनातील सुखांताकडे पोहोचते.
स्वत- शिक्षक असलेल्या मधुकर तोरडमल यांनी अहमदनगर महाविद्यालयात जवळपास दहा वर्षे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात विद्यार्थ्यांचे बोलणे, त्यांची प्रेमप्रकरणे, चेष्टामस्करी आणि एकूणच महाविद्यालयीन वातावरण त्यांनी अगदी जवळून अनुभवले. त्याच अनुभवांतून या नाटकातील अनेक पात्रे आकाराला आली. ‘प्रा. बारटक्के’ या पात्राच्या तोंडी असलेली ‘ह’ची बाराखडीसुद्धा लेखकाने प्रत्यक्ष पाहिलेल्या एका व्यक्तीवर आधारित आहे. एकेकाळी एका समीक्षकाने या नाटकाबद्दल, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत- पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात पाहू नये,’ असे मत नोंदवले होते. मात्र झाले नेमके उलटे. या विधानामुळेच उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला व तरुणींनी रांगा लावून हे नाटक हाऊसफुल्ल केले.
यानंतर विविध नटसंचांतून या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले. प्रा. बारटक्के यांची भूमिका बहुतेक वेळा स्वत- तोरडमल यांनीच साकारली. आत्माराम भेंडे यांनी काही प्रयोगांत ही भूमिका केली असली तरी तिला ती सर आली नाही. सध्याच्या प्रयोगांत अतुल तोडणकर प्रा. बारटक्के प्रभावीपणे साकारतात. मध्यंतरीच्या आजारपणानंतर या भूमिकेतून त्यांनी दिमाखदार पुनरागमन केले आहे. मात्र इतर काही कलाकार अपेक्षेइतके चपखल बसत नाहीत. बंडा आणि प्यारे ही पात्रे वयाने जरा अधिकच थोराड वाटतात, तर दीनानाथ थत्तेमध्ये अपेक्षित ग्रेस जाणवत नाही. पुंदाच्या भूमिकेत चिंतन लांबे लक्ष वेधून घेत असले तरी ती भूमिका अजून संयमित करता येईल आणि त्यामुळे ती अधिक प्रभावी होईल.
दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी नव्या पिढीला साजेसे काही पंचेस आणि वन-लायनर्स घालण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र ते फारसे लक्षवेधी ठरत नाहीत. जुन्या काळातील काही संदर्भ आजच्या काळात खटकतात; त्यांना अधिक घासून-पुसून सादर करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ मैत्रिणींना सिनेमा आणि हॉटेलमध्ये पार्टी देण्यासाठी ढमी पाचशे रुपये मागते, ते निदान पाच हजार तरी असायला हवे. असे अनेक छोटेमोठे संदर्भ आहेत जिथे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पूर्वसुरींनी हे नाटक ज्या उंचीवर नेऊन ठेवले आहे, तिथे पोहोचण्यासाठी नव्या चमूला अजून बरीच मेहनत घ्यावी लागेल. पुनरुज्जीवित नाटकांचा हा एक ठळक तोटा असतो, नव्याची तुलना सतत जुन्याशी होत राहते.
पाच हजारांहून अधिक प्रयोगांचा मान मिळवलेले ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक आहे. राजाराम शिंदे यांची ‘नाटय़मंदार’, मोहन वाघ यांची ‘चंद्रलेखा’ आणि मधुकर तोरडमल यांची ‘रसिकरंजन’ या संस्थांनी मिळून या नाटकाचे हजारो प्रयोग सादर केले. या अफाट यशानंतर तोरडमल यांनी ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ हा उत्तरार्ध रंगभूमीवर आणला, मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ तुम्ही पूर्वी पाहिले असेल तर स्मरणरंजनासाठी हा प्रयोग एकदा पाहायला हरकत नाही. मात्र जुन्या प्रयोगांच्या तुलनेत फार मोठय़ा अपेक्षा न ठेवलेल्या बऱया.
लेखक – प्रा. मधुकर तोरडमल
दिग्दर्शक – राजेश देशपांडे
कलाकार – अभिजित चव्हाण, नीता पेंडसे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, चिंतन लांबे, निलेश देशपांडे, श्रुती पाटील आणि अतुल तोडणकर.
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – तुषार देवल
प्रकाश योजना – श्याम चव्हाण
वेशभूषा – मंगल केंकरे
व्यवस्थापक – सुधीर रोकडे, राजदत्त तांबे, जगदीश शिगवण
निर्माते – प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर, विजया राणे.




























































